‘..अन राज ठाकरेंनी टोल अधिकाऱ्यांना भरला दम’; सिद्धूने शेअर केला खालापूर टोलनाक्यावरील अनुभव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवारी पिंपरी चिंचवड येथील नाट्य संमेलनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहिले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने परतत असताना खालापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतं आणि कारण होतं टोल नाका. या ट्रॅफिकमध्ये राज ठाकरे स्वतः अडकले होते. दरम्यान त्यांनी जी भूमिका घेतली ती पाहण्याजोगी ठरली. अभिनेता सिद्धार्थ जाधवने एक व्हिडीओ शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या असताना राज ठाकरे संतापले अन् थेट गाडीतून उतरून त्यांनी टोल अधिकाऱ्यांना दम भरला. यानंतर अडकून पडलेल्या गाड्यांना वाट मोकळी करून दिली. दरम्यान राज ठाकरेंसोबत प्रवासात असलेल्या सिद्धार्थ जाधवने हा सगळा प्रकार पाहिला आणि व्हिडीओ शेअर करत म्हणाला, ‘नमस्कार मी सिद्धार्थ जाधव. माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर मी पुण्यापासून ते मुंबईपर्यंत प्रवास करत होतो. नाट्य संमेलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांच्याबरोबरच प्रवास करत होतो. एक्स्प्रेस हायवेवरून खालापूर टोलनाक्याला येताना वाहनांची रांग पाहिली. साहेब स्वतः गाडी चालवतं होते. मी त्यांच्या गाडीत बसलो होतो. साहेबांच्या पोलिसांच्या व्हॅनने त्यांच्या गाडीला रस्ता करून दिला होता. पण ते स्वतः थांबले. आम्हाला काही कळायच्या आत ते गाडीतून उतरले’.

‘त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भाषेत समजावलं. आताच्या आत सगळ्या गाड्या सोडा. कारण चार ते पाच किलोमीटर गाड्यांची रांग लागली होती. त्यात कुठेतरी रुग्णवाहिका अडकली होती, लोकं कंटाळली होती. पण साहेबांनी त्यांच्या भाषेत सांगितल्यानंतर लगेच पटापट गाड्या सोडण्यात आल्या. एवढं करून ते गेले नाहीत, तिथे थांबले. रुग्णवाहिका जाईपर्यंत ते तिथेच थांबले होते. मग निघताना साहेबांनी सांगितलं, एकही गाडी थांबली नाही पाहिजे. पुढेही त्याच्याबरोबर प्रवास करताना वाशी टोलनाका असेल किंवा इतर टोलनाक्यांवर थांबून जिथे जिथे वाहतूक कोंडी आहे, तिथे उतरून खडसावून सांगितलं. माझ्यासाठी हा विलक्षण अनुभव होता. सकाळी नाट्य संमेलनात मी त्यांची मुलाखत पाहिली होती. ज्यामध्ये कलाकारांविषयी ते ज्या आत्मीयतेने गोष्टी बोलत होते, तेही भावलं होतं’. टोल नाक्यांवरील नियमांबाबत चर्चा होऊनही अद्याप टोल प्रशासनाकडून आहे तोच कारभार सुरु असल्याचे राज ठाकरे यांनी स्वतः अनुभवले. त्यामुळे आता मनसे पुन्हा टोलनाक्याबत गंभीर भूमिका घेताना दिसणार का..? असा सवाल उपस्थित झाला आहे.