गायक महेश काळेने केला ‘वंदे भारत एक्सप्रेस’मधून प्रवास; सोशल मीडियावर शेअर केला अनुभव


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या भारताच्या प्रगतीचा वेग तुफान आहे. या प्रगतीचा एक मुख्य भाग आहे ‘भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण’. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेकडून ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यात आली आहे. ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रवासी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी वंदे भारत एक्प्रेसमधून प्रवास केला असून त्यांनी आपला अनुभव सांगितला आहे. महेश काळे यांनी सोशल मीडियावर आपला अनुभव चाहत्यांसह शेअर केला आहे.

गायक महेश काळे हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ, कार्यक्रमांचे अपडेट ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांचे फॉलोवर्सदेखील प्रचंड आहेत. त्यामुळे महेश काळे यांनी शेअर केलेल्या पोस्टला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. नुकतंच त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक कॅप्शन देत आपल्या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे.

हि पोस्ट शेअर करताना महेश काळे यांनी लिहिलं आहे कि, ‘मी नुकताच वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. खरोखरच खूप छान वाटले. मी जगभरात प्रवास करतो, पण या कामगिरीसाठी मला भारतीय रेल्वेचे कौतुक करावेसे वाटते आणि त्यांचा अभिमानही वाटतो. मी आशा करतो की, वंदे भारत पुरवत असलेल्या सर्व सुखसोयी अशाचप्रकारे कायम राहतील’. या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी प्रवासाकरता शुभेच्छा देत म्हटले आहे कि, ‘वा वंदे भारत रेल्वेतून प्रवासाचा छान अनुभव घेताय दादा तू आम्ही फक्त वंदे भारत नाशिकला स्टेशनवर बघितली मस्त ट्रेन आहे भारतीय रेल्वे दादा केले कौतुक भारी…..हा प्रवास खूप खूप सुखाचा होवो हीच शुभेच्छा काळजी घ्या पाऊस सुरू झाला आहे’.