हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘३६ गुणी जोडी’ हि मालिका येत्या काहीच दिवसांत निरोप घेणार आहे. असे असताना गेल्या काही दिवसापांसून मालिकेत येणारे ट्विस्ट हे प्रेक्षकांच्या पत्थ्यावर पडताना दिसत आहेत. मालिकेतली मुख्य पात्र अमुल्या आणि वेदांत या जोडीवर प्रेक्षक प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत असून मालिकेला आता एक रंजक वळण देण्यासाठी आणखी एका पात्राची जबरदस्त एंट्री झाली आहे. गायक रोहित राऊतने अभिनय क्षेत्रात पदार्पण करत या मालिकेत एंट्री केली आहे.
मराठी सिंगिंग रिऍलिटी शो ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून प्रकाशझोतात आलेल्या पंचरत्नांपैकी एक म्हणजे रोहित राऊत. उत्तम गायक, इंटरटेनर आणि आता अभिनेता म्हणून रोहितने ‘३६ गुणी जोडी’ मालिकेत एंट्री केली आहे. वेदांतचा मित्र ‘अमर्त्य’ म्हणून तो या मालिकेत दिसतोय. नुकताच यूएसहुन मायदेशी परतलेला अमर्त्य मालिकेतील पात्राला अत्यंत रंजक पद्धतीने वळवतो आहे. वेदांतचा बेस्ट फ्रेंड अमर्त्य आता या ३६ गुणी जोडीला जोडणार..? का तोडणार..? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
झी मराठी वरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेला शेवटच्या वळणावर येऊन प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेत अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळतेय. मालिकेची टॅग लाईन ‘प्रत्येक जोडी जुळत नसते’ ही कमालीची लक्षवेधी ठरली. तर मालिकेचे कथानक तरुणाईला प्रचंड भावले. वेदांतच्या ऑफिस पिकनिकमध्ये त्याचा बेस्ट फ्रेंड ‘अमर्त्य’ आता सामील झाला आहे. कमालीचा अंदाज, मंत्रमुग्ध करणारी गायकी आणि हटके स्टाईलने तो काय जादू करताना दिसणार… हे पाहणे रंजक ठरणार आहे.