‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीची ‘या’ लोकप्रिय मालिकेत वर्णी; साकारतेय महत्वाची भूमिका


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रचंड लोकप्रिय आहेत. गेल्यावर्षी लोकप्रिय मालिकांपैकी ‘सहकुटुंब सहपरिवार’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि त्यानंतर या मालिकेतील कलाकार वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करताना दिसत आहेत. मालिकेतील अवनी म्हणजेच साक्षी गांधी ‘नवी जन्मेन मी…’ या मालिकेत तर सरू म्हणजेच नंदिता पाटकर नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. यानंतर आता मालिकेतील अंजली म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘अबोली’मध्ये झळकणार आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत अभिनेत्री कोमल कुंभारने ‘अंजली’ ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले होते. यानंतर मालिका संपली मात्र अंजली प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. कोमलला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले असताना आता लवकरच एका नव्या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेत ती ‘मनवा’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मनवा ही या मालिकेतील खूप महत्त्वाची भूमिका असून ती भूमिका कोमलच्या पदरी पडली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून अबोली मनवाचा शोध घेत असल्याचे आपण मालिकेत पहिले. तिचा शिंदे कुटुंबाशी आणि बहुरुप्याशी नेमका काय संबंध आहे..? ते आता लवकरच समोर येणार आहे. हि भूमिका अत्यंत वेगळ्या ढंगाची असल्यामुळे कोमल या भूमिकेबाबत उत्सुक आहे.

याबद्दल बोलताना ती म्हणाली कि, ‘मी येतेय पुन्हा एकदा स्टार प्रवाहवर तुम्हाला भेटायला. नव्या आणि वेगळ्या भूमिकेतून. आधी जे पात्र केलं ते खूप वेगळं होतं आणि आता जे करतेय ते त्यापेक्षाही खूप वेगळं आहे, माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे आणि छान वाटतंय मला हे सगळं करायला. मी खूप एक्साईटेड आहे’. मालिकेचा प्रोमो समोर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये देखील तिच्या या भूमिकेविषयी उत्सुकता चांगलीच वाढली आहे आणि आजपासून कोमल या मालिकेत दिसणार आहे.