हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने जगतातील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण विठ्ठल तरडे त्यांचा आगामी चित्रपट ‘धर्मवीर २’मुळे प्रचंड चर्चेत आहेत. केवळ सिनेमा किंवा अभिनयामुळे नव्हे तर अनेकदा ते आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असतात. प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे देखील सिनेविश्वाचा एक भाग आहे. मराठी चित्रपट सृष्टीत स्नेहल तरडेदेखील अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेत. प्रवीण आणि स्नेहल हि जोडी कलाविश्वात पावर कपल म्हणून ओळखली जाते. आज या जोडीने आपल्या सुखी संसाराची १४ वर्ष पूर्ण केली आहेत.
अभिनेत्री स्नेहल तरडे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. यामुळे वेगवेगळे अनुभव, किस्से, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती आणि वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. या माध्यमातून आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत तिने पती प्रवीण तरडे यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. याआधीदेखील अनेकदा स्नेहल आवर्जून वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपल्या नवऱ्यावरील प्रेम व्यक्त करताना दिसते. पण आजचा दिवस खास आहे आणि त्यामुळे हि पोस्टदेखील तितकीच खास आहे.
स्नेहल तरडे यांनी शेअर केलेली ही पोस्ट एक व्हिडीओ आहे. यामध्ये ती पती प्रवीण यांच्यासोबत चालत जाताना दिसते आहे. या व्हिडिओला ‘ए जिंदगी गले लगा ले..’ हे गाणं बॅकग्राऊंडला वापरण्यात आलं आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय, ’14 पूर्ण !! तुझ्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तू.. अपूर्णच!! एकमेकांना अशीच साथ देत राहू आणि आयुष्य पूर्णत्वास नेऊ. Happy Anniversary, my better half !!’ स्नेहलच्या या पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करताना या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.