‘काळी साडी, हलव्याचे दागिने अन् पतंग…’; प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने अशी साजरी केली लग्नानंतरची पहिली संक्रांत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| कलर्स मराठीच्या ‘रमा राघव’ या मालिकेत अश्विनी हे पात्र साकारत अभिनेत्री सोनल पवार घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचली. अलीकडेच सोनल पवारचे लग्न झाले आणि यानंतर तिने ही मालिका सोडली. मालिका सोडली असली तरीही सोनलचे चाहते तिच्या संपर्कात आहेत. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि याच माध्यमातून तिने लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर सोनल कायम निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. गतवर्षी २८ डिसेंबर रोजी सोनलचा समीर पालुष्टेसोबत विवाह संपन्न झाला आणि दोघांच्या सुखी संसाराची सुरुवात झाली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर आता सोनलने लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनल पवारने रितीनुसार काळया रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. शिवाय हलव्याचे दागिने परिधान करून पारंपरिक साजशृंगारामूळे सोनल फार सुंदर दिसत आहे.

अत्यंत साधेपणाने मात्र रिती परंपरेनुसार सोनल पवारने लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत तिच्या नवऱ्यासोबत साजरी केली आहे. या फोटोमध्ये सोनल तिचे पती समीरसोबत मकर संक्रांत साजरी करताना दिसत आहे. या खास सणासाठी सोनलच्या नवऱ्याने म्हणजेच समीरनेदेखील काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता आणि त्यावर हलव्याचा हारसुद्धा परिधान केला होता. या फोटोंसोबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सोनल आणि समीर आनंदाने पतंग उडवताना दिसत आहेत. संक्रांतीनिमित्त सोनल आणि समीर यांनी केलेल्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.