सोनाली- कुणालने दुबईत खरेदी केलं आलिशान घर; नेमप्लेटने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अप्सरा अशी जिची ओळख आहे ती अभिनेत्री म्हणजे ‘सोनाली कुलकर्णी’. ‘नटरंग’, ‘मितवा’, ‘पोश्टर गर्ल’, ‘हिरकणी’ आणि अशा अनेक दर्जेदार कलाकृतींमध्ये तिने अव्वल काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या आणि नृत्य शैलीच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे. अनेकांची क्रश असणारी सोनाली मिसेस बेनोडेकर झाली आणि अनेक तरुणांची हृदय तुटली. पण सोनालीचा संसार सुखात सुरु आहे हे पाहून तिचे चाहते कायम आनंद व्यक्त करत असतात. अशातच सोनालीने एक आनंदाची बातमी दिली आहे.

सध्या सोनाली तिच्या नवऱ्यासोबत अर्थात कुणालसोबत दुबईत दिवाळी साजरी करतेय. दरम्यान तिने दुबईतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनालीने दुबईत नवे घर खरेदी केल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने दुबईतील नव्या आलिशान घराची झलक शेअर केली आहे. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘पाडवा in the new होम’ (नव्या घरात पाडवा).

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या नव्या घराची झलक आपल्याला पहायला मिळत आहे. तर दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर घेतल्याबद्दल तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत ७ मे २०२१ रोजी दुबईत लग्नगाठ बांधली आणि वैवाहिक आयुष्यास सुरूवात केली. तर सोनाली तिच्या मराठमोळ्या परंपरा दुबईतदेखील पाळते आणि सण साजरे करतेय हे पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.