सोनाली कुलकर्णीने स्वतःच्या हाताने घडवला इको फ्रेंडली बाप्पा; शेअर केला व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या दोन दिवसांनी गणपती बाप्पा येणार आहे. गणेशोत्सव हा सण केवळ आनंद किंवा उत्साहाचा नाही तर हा सण भावनेशी संबंधित आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. जो तो लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहे. सर्व सामान्यांप्रमाणेच मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी देखील मोठ्या आनंदाने बाप्पाला घरी विराजमान करतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गणपती बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवली आहे आणि याचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्ष सोनाली तिच्या भावासोबत गणपती बाप्पाची पर्यावरणपूरक मूर्ती घडवते. त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा सोनालीने बाप्पाचं खास स्वरुप साकारलं आहे. बाप्पाचं आगमन दोन दिवसांवर आले असताना सोनालीने सोशल मीडियावर बाप्पाची मूर्ती घडवतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिने गणपती बाप्पाची मूर्ती घडवतानाचा हा सुंदर व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. सोनालीने बाप्पाची मूर्ती घडवण्यासाठी देहूगावची माती आणि घरातील तुळशीचा वापर केला आहे.

या व्हिडीओमध्ये सोनाली म्हणतेय, ‘गेल्या पाच वर्षांपासून मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं मिळून आमचा बाप्पा बनवतो. यंदाचा गणेशोत्सव आमच्यासाठी खूप भावनिक आहे कारण, माझी आजी यंदा माझ्याबरोबर नाही. गेल्यावर्षी आजी आम्हाला सोडून गेल्यामुळे आम्ही गणेशोत्सव साजरा करू शकलो नव्हतो. एवढी वर्ष मी आणि माझा भाऊ मूर्ती बनवत असताना आजी दारावर उभी राहून आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायची. हा गणेशोत्सव आम्ही पहिल्यांदाच तिच्याशिवाय साजरा करत आहोत. परंतु, तिची आठवण कायम आमच्याबरोबर असेल. आमचे आजी-आजोबा देहूगावला राहायचे, त्यामुळे देहूगावचे आमच्यावर अनेक संस्कार आहेत. त्यामुळे यंदा आम्ही देहूगाव आणि आजी-आजोबा यांच्याशी जवळचं नातं असलेली मूर्ती साकारली. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या रुपात आम्ही बाप्पा साकारण्याचा प्रयत्न केला आहे’. सोनालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.