थकत कशी नाहीस गं तू..? सोनाली कुलकर्णीने सादर केली आईसाठी खास कविता


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. विविध चित्रपटांमधून अव्वल भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. नुकतीच सोनाली कुलकर्णी तिची खास मैत्रीण मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकरसोबत ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘सारेगमप’ या कार्यक्रमात हजर राहिली होती. यावेळी सोनालीने ‘आई’साठी अत्यंत भावनिक अशी कविता सादर केली.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘सारेगमप’च्या मंचावर ‘आई, थकत कशी नाहीस गं तू?’ ही कविता सादर केली. या कवितेतून सोनालीने एक आई दिवसभर तिच्या कुटुंबासाठी, लेकरांसाठी काय आणि किती कष्ट घेते ते सांगितले आहे. मुख्य म्हणजे एव्हढं सगळं करूनही आई तू दमत नाहीस का..? असा गोड प्रश्न सोनालीने प्रत्येक आईला विचारला आहे. हि कविता खालीलप्रमाणे:-

‘आई, थकत कशी नाहीस गं तू..?’

सूर्य उगवण्याआधी दिवसाची सुरुवात करतेस तू,
चंद्र नभी आला तरी थकत कशी नाहीस गं तू..?

ऑफिसच्या कामातही मुलांची आठवण काढतेस तू,
जबाबदारीचं ओझं पेलून थकत कशी नाहीस गं तू..?

दमून भागून घरी आल्यावर पसारा बघून चिडतेस तू,
भांडता- भांडता आवरताना थकत कशी नाहीस गं तू..?

घर- कुटुंब सर्वांची तुला नेहमीच असते आस,
आमच्यासाठी झटतेस तू १२ महिने २४ तास
मग अशावेळी विचारावं वाटतं थकत कशी नाहीस गं तू..?

प्रश्नाचं उत्तर देतानाही कोणत्या तरी कामात व्यस्त असते तू,
आज मात्र शिणलेल्या डोळ्यांना थोडा आराम दे…
पण, आधी एका प्रश्नाचं उत्तर दे तू, थकत कशी नाहीस गं तू..?

सोनालीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावर नेटकरी प्रतिक्रिया देत तिचे कौतुक करत आहेत.