‘माझ्या आयुष्यात ज्यांनी ”अजिंठा” आणला…’; देसाईंनंतर महानोर यांच्या निधनाने सोनाली झाली भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आणि युवा वृत्ताने सिनेविश्व शोकसागरात बुडाले. या धक्क्यातून अद्याप सिनेसृष्टी उभारलेली नसताना आज ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी नामदेव धोंडो महानोर यांच्या निधनाचे वृत्त सकाळी समोर आले. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. या दोन्ही हिऱ्यांचे असे अचानक जाणे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण करणारे ठरले आहे. यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करताना ‘अजिंठा’ चित्रपटावेळीचा एक फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली… नितीन देसाईंनंतर…ना. धो. महानोर….. असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…! माझ्या आयुष्यात ज्यांनी “अजिंठा” आणला असे नितीन देसाई आणि या महाकाव्याचे जनक ना.धों. महानोर आज आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर रहातील, आपल्याला आयुष्यभर उर्जा देत रहातील हे नक्की’.

‘नितीन चंद्रकांत देसाई यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच… पद्मश्री ना.धो.महानोर यांना अजिंठा या चित्रपटाच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता.. त्यांचं “अजिंठा” नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य लाभलं’.

‘रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना.धो. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. “जैत रे जैत” ते “अजिंठा” ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली’.