आवलीची जखम कायमची का भरली..? सोनाली कुलकर्णीची ‘ती’ पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर दैवत्वाची प्रचिती देणारं ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक तुफान गाजलं. अलीकडेच २२ नोव्हेंबर २०२३ रोजी कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर या नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडला आणि या नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या नाटकाचा शेवटचा प्रयोग मुंबईच्या षणमुखानंद नाट्यगृहात पार पडला. प्रेक्षकांच्या आणि रंगभूमीच्या साक्षीने या नाट्यकलाकृतीने निरोप घेतला. मात्र या नाटकाने गाजवलेली ६ वर्ष सर्वांच्या लक्षात राहिली. या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. ज्यामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा समावेश होता. नाटक पाहिल्यानंतर सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या उत्तम कलाकृतीला निरोप दिला आहे.

सोनालीने हि पोस्ट शेअर करताना लिहिलंय, ‘अद्भूत, अलौकिक आणि अविस्मरणीय … काल “कार्तिकी एकादशी”च्या पूर्वसंध्येला ही विलक्षण कलाकृती अनुभवता आली. इंद्रायणी काठी खूप साऱ्या भावना खळबळून आल्या, आता २४ तासांनंतरही, अजूनही, तीची अनुभुती जाणवते आहे. खरं सांगू तर त्या भावनांचा कल्लोळ योग्य त्या शब्दांमध्ये मांडता येईल असं वाटंत नाही… त्यामुळे थोडक्यात पण एवढंच म्हणेन की, आस्तिकतेच्या – नास्तिकतेच्या शोधातील ही कलाकृती, लिखाण, दिग्दर्शन, संगीत, सादरीकरण, अभिनय, गायन…. सगळंच खूप “दैवी” आहे …! आणि एकच सवाल, आवलीची जखम कायमची का भरली…?’

या पोस्टसोबत सोनालीने देवबाभळी 500, निरोपाचाक्षण, निरोपाचीवेळ असे हॅशटॅग देखील दिले होते. प्राजक्त देशमुख यांची सर्वोत्तम कलाकृती असणाऱ्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाला सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अवघा महाराष्ट्र विठुमय करत ‘देवबाभळी’ नाटकाने ५०० प्रयोग पूर्ण केले आणि त्यानंतर हि प्रयोग वारी थांबली. या नाटकाला प्रेक्षकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभल्यामुळे न केवळ प्रेक्षक त्यांच्यासह कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी निरोप समयी भावुक झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान इतर कलाकार मंडळींसह अभिनेता जितेंद्र जोशीदेखील या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाला हजर होता. त्याने सोशल मीडियावर या नाट्यकलाकृतीला काव्यमय निरोप दिला आहे. त्याची ही कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.