मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या!! सोनाली कुलकर्णीने दिला लाडक्या बाप्पाला निरोप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दहा दिवसात राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला गेला. पण अखेर आज तो दिवस आला जेव्हा बाप्पा परतीच्या वाटेला मार्गस्थ झाले आहेत. आज अनंत चतुर्दशी आणि आजच्या दिवशी सगळेच आपल्या लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील तिच्या घरगुती बाप्पाचे विसर्जन केले आहे. दरम्यान पुढच्या वर्षी लवकर या म्हणत सोनाली आणि तिच्या भावाने बाप्पाला निरोप दिला आहे.

राज्यात सगळीकडे आज अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जात आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींच्या घरीदेखील दहा दिवसाचा बाप्पा विराजमान झाला होता. त्यांपैकी एक अभिनेत्री सोनाली कुलकर्णी असून “गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या!!’ म्हणत तिने आपल्या घरगुती बाप्पाला निरोप दिला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निगडी प्राधिकरणमधील आकुर्डी परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात गणपती विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे.

अभिनेता सोनाली कुलकर्णीने आपल्या घरगुती बाप्पाचे विसर्जन याच तलावात केले आहे. यावेळी सोनालीबरोबर तिचा भाऊ अतुल कुलकर्णीदेखील उपस्थित होता. सोनालीने विसर्जनाचा एक व्हिडिओ अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असं कॅप्शन दिलं आहे. सालाबादप्रमाणे यंदाही सोनाली कुलकर्णीने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला आहे. यावर्षी सोनालीचा बाप्पा संत तुकोबा रायांचे रूप घेऊन विराजमान झाला होता. सोनालीच्या बाप्पाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसले.