हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सव म्हटलं कि सर्वत्र आनंद, उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आपोआपचं निर्माण होते. आजपासून राज्यभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्त अनेकांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचे अगदी जल्लोषात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया’चा नाद सर्वत्र घुमला. अनेक सिने कलाकारांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरीदेखील बाप्पाचे आगमन झाले आहे. मात्र तिच्यासाठी यंदाचा गणेशोत्सव भावनिक आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. यंदा सोनालीने स्वतःच्या हाताने इकोफ्रेंडली गणपती बाप्पाची मूर्ती घडवली आहे. गणपती बाप्पाच्या माध्यमातून तिने संत तुकोबा रायांचे रूप साकारले आहे. यंदाचा गणेशोत्सव सोनालीसाठी अत्यंत भावनिक आहे. कारण गतवर्षी सोनालीच्या आज्जीचे निधन झाले होते. ज्यामुळे सोनालीच्या कुटुंबाने गणेशोत्सव साजरा केला नाही. मात्र यंदा सोनाली आपल्या कुटुंबासोबत आणि आज्जीच्या आठवणींसह उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आहे.
आज सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं. सोनाली आणि तिचा भाऊ अतुल यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारली. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये वरुण राजाची कृपादृष्टी दिसली. मात्र ज्या ठिकाणी दुष्काळाचे सावट आहे, तिथपर्यंत सर्वदूर पाऊस पडावा आणि बळीराजा सुखी व्हावा असं साकडं सोनालीने बाप्पाचरणी घातलं आहे. यंदाचा गणेशोत्सव सोनाली आणि तिच्या कुटुंबासाठी भावनिक असला तरीही पारंपरिक रितीरिवाजात कोणतीही त्रुटी न ठेवता ते बाप्पाची सेवा करत आहेत. यावर्षीची इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती सोनालीने तिच्या आज्जीला समर्पित केली आहे.