सोनाली खरेने सिनेविश्वातील मित्र मैत्रिणींसोबत साजरा केला हॅपी बड्डे; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरेने नुकताच ५ डिसेंबर २०२३ रोजी स्वतःचा ४१ वा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्र मैत्रिणींनी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. इतकेच नव्हे तर मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार सोनालीच्या घरी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. शिवाय सोनालीचे पती बिजय आनंद आणि लेक सनाया या दोघांनी देखील तिच्या वाढदिवसाचं छान प्लॅनिंग केलं होतं.

सोनाली खरेच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी सिने सृष्टीतील बरीच मंडळी गेली होती. यामध्ये संजय जाधव, अदिती सारंगधर, संगीतकार अमितराज, क्षितिज पटवर्धन, सुशांत शेलार, प्रिया बापट, उमेश कामत, विक्रम फडणीस, प्रियांका तन्वर, शुभांगी लटकर अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. सोनालीचे हे सगळे जुने मित्र एकत्र तिच्या घरी तिच्या वाढदिवसानिमित्त आलेले पाहून ती भारावून गेली. सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाच्या या खास सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत.

सोनालीने तिच्या वाढदिवासाच्या पार्टीचे फोटोज अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘माझ्या खास दिवशी तुम्ही सर्वांनी मला दिलेल्या प्रेम आणि हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद!! तसेच माझ्यासाठी तुम्ही लोकांनी वेळ काढला आणि मला शुभेच्छा देण्यासाठी आलात आणि माझा खास दिवस हा अविस्मरणीय बनवून साजरा केलात… लव्ह यू ऑल.. मी अद्भुत माणसांच्या सोबतीने धन्य झाले…’

याशेवटी सोनालीने तिची लाडकी मैत्रीण अमृता खानविलकर, अंकुश चौधरी आणि हर्षदा खानविलकर यांना मिस केल्याचे म्हटले आहे. काही कारणांमुळे हे तिघे सोनालीच्या बर्थडे पार्टीला उपस्थित राहिले नव्हते. पण अमृताने मात्र आपल्या लाडक्या मैत्रिणीला खास पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिची हि पोस्ट तुफान व्हायरल झाली होती.