हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतीक्षित सिनेमा ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यापासून नुसता ट्रोल होतोय. पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार, हनुमानाचे संवाद आणि सपशेल गंडलेले VFX या ट्रोलिंगचे मुख्य कारण आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले असून या सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांचादेखील समावेश आहे. सिनेमात प्रभासने प्रभू श्रीराम, क्रितीने माता सीता, सैफ अली खानने रावण तर मराठी अभिनेता देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे. देवदत्त शिवाय या सिनेमात तेजस्विनी पंडित शूर्पणखेच्या भूमिकेत दिसली आहे. यानंतर आता आणखी एक मराठी चेहरा अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसल्याचे समोर आले आहे.
View this post on Instagram
ज्या प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला त्यांना यामध्ये असणाऱ्या मराठी कलाकारांची ओळख तर आधीच पटली असेल. पण ज्यांनी हा सिनेमा पाहिला नाही त्यांना आम्ही सांगू इच्छितो कि, या सिनेमात अनेक मराठी कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. त्यामुळे सिनेमा बाकी कितीही गंडलेला असला तरी मराठी कलाकारांचे बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतून मोठ्या पडद्यावर दिसणे फारच अभिमानास्पद आहे. देवदत्त नागे, तेजस्विनी पंडितनंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरेदेखील या सिनेमाचा भाग असल्याचे तिने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे. यानंतर तिच्या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी सिनेमाबाबतची नाराजी व्यक्त केली आहे.
‘आदिपुरुष’ रिलीज होईपर्यंत या सिनेमात इतर भूमिकांमध्ये मराठी कलाकार असल्याचे उघड केले गेले नव्हते. रिलीजनंतर या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित शूर्पणखेच्या भूमिकेत दिसली. तर आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री या सिनेमात कैकेयीची भूमिका साकारताना दिसली आहे. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सोनाली खरे आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना कैकेयी भूमिकेचा लूक शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. सोनालीच्या या लूकसाठी चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. मात्र सिनेमाबाबत बोलताना अनेकांनी निराशाजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे कि, ‘तुमच्या विरोधात काहीही नाही पण हा एक भयंकर चित्रपट आहे’. तर आणखी एकाने म्हटले, ‘तुला भूमिका चांगली मिळाली पण सिनेमा फ्लॉप मिळाला .. याच वाईट वाटलं’. ‘एकदम फ्लॉप सिनेमा आहे.. ज्याचा तू भाग आहेस’, असेही एकाने म्हटले आहे.