‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे खरे आई- बाबा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अटकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय या चित्रपटात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहे. आता हे नवोदित कलाकार कोण..? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना..? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, हे नवोदित कलाकार म्हणजे सोनाली कुलकर्णीचे खरे खुरे आई – बाबा.

होय. पुण्यात चित्रीकरण असल्याने सोनालीचे आई- बाबा तिला सहजच सेटवर भेटायला गेले होते. यावेळी बसमधील प्रवास करतानाचा सीन चित्रीत केला जात होता. मग काय सोनालीचे आई- बाबा तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली आणि दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनीही अभिनय करण्याची ही संधी स्विकारली.

या चित्रपटात ते सह प्रवाशाच्या छोट्याशा भूमिकेत झळकणार आहेत. आपल्या मुलीसोबत काम करण्याची छोटी संधी त्यांना मोठा आनंद देऊन गेली. त्यामुळे हा आनंद काही औरच आहे, अशा शब्दांत सोनलीच्या आई-बाबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील आपल्या आई- बाबांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल असल्याचे म्हटले आहे. शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. ज्याच्या माध्यमातून वडील आणि मुलाच्या संवेदनशील नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आधीच वाढली आहे. तर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपायला आता अवघे तीन दिवस शिल्लक आहेत.