‘या व्यक्तींचं मला आकर्षण…’; तृतीय पंथीयांच्या भेटीनंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केली ‘ती’ खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. कायम या ना त्या कारणामुळे ती चर्चेचा विषय ठरते. अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल देखील होताना दिसतात. आताही तिने शेअर केलेली एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ती तृतीय पंथींबरोबर दिसते आहे. तिची ही व्हिडीओ पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री सोनाली पाटीलने तृतीयपंथींना भेटल्यानंतरचा अनुभव शेअर करताना हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे कि, ‘श्रीकृष्णा तू अद्भुत कलाकृतींचा जनक आहेस हे मला आणि जगातील बुद्धिमान सजीवांना माहित आहे… तू एक ना अनेक अद्भुत कलाकृती निर्माण केल्या आहेस. त्यामधे स्त्री, पुरुष आणि त्याच्या व्यतिरिक्त तिसरी व्यक्ती म्हणजे तृतीयपंथी. ही तूच तयार केली आहेस … पहिल्यापासूनच का कुणास ठाऊक या व्यक्तींचं मला आकर्षण आणि त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असं मनामध्ये कुतूहल नेहमी असायचं आणि असतं. जेव्हा केव्हा त्या समोर येतात जशा त्यासमोर येतात तसं मी त्यांच्याकडे बघत राहते. कारण तुझी कलाकृती इतकी सुंदर आहे, अद्भुत आहे, कदाचित त्यामुळे असेल…’.

पुढे लिहिलंय, ‘आपल्या लेखी भाषेमध्ये त्यांना तृतीयपंथी, थर्ड जेंडर म्हणतात. त्यांच्यापासून मी कधीच पळाले नाही, घाबरले नाही. कदाचित म्हणूनच त्यांना पाहिल्यावर आणि त्यांनी मला पाहिल्यावर आम्ही बोललो, भेटलो आणि व्लॉगमध्ये देखील कॅप्चर ही केलं… ते आपला स्वीकार करतात ना मग चला तर आपण पण त्यांचे होऊ… बिग बॉस वाल्यांनो मला पुन्हा बिग बॉसच्या घरात घ्या अशी मागणी आलेली आहे. तेव्हा प्लीज मला लवकर बोलवा…’. सोनालीने या भेटीचा व्लॉग तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. जो चांगलाच चर्चेत आला आहे.