‘समग्र स्त्रीत्व साक्षी होत..’; कुस्तीपटू साक्षी मलिकच्या निवृत्तीवर सौमित्र यांनी रचली कविता


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघ आणि त्यावरून निर्माण झालेला तणाव विविध स्तरावर प्रचंड चर्चेत राहिला. संजय कुमार सिंह यांनी महासंघाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. जे भाजपाचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली. हि बातमी पसरताच सगळ्यांना धक्का बसला.

असोसिएशनमधील राजकारण, आंदोलना दरम्यान त्यांच्यावर झालेले अत्याचार आणि आताचा निकाल पाहून अखेर साक्षी मलिकने कुस्ती सोडायचा निर्णय घेतला. यावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. ज्यामध्ये कवी सौमित्र यांचाही समावेश आहे. एका कवितेच्या माध्यमातून त्यांनी आपले मत प्रकट केले आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी साक्षी मलिकच्या निवृत्तीवर रचलेली कविता व्हायरल झाली आहे. ही कविता खालीलप्रमाणे :-

प्रदूषित चौक.
लक्ष्मी सरस्वती
तुळजाई रख्माई
सार्या सार्याच देवी
आपापली देवळं
नि मुर्त्या सोडून
बाहेर पडून शेवटी
एकत्र येऊन
उभ्या राहिल्या
प्रदूषित हवेच्या
स्वाभिमान चौकात
तेंव्हा समग्र स्त्रीत्व
साक्षी होत
म्हणू शकलं
हतबलपणे
कसे बसे
दोनच शब्द
आय क्विट
ही
तेंव्हाची गोष्ट ….

सौमित्र.

या कवितेसोबत सौमित्र यांनी साक्षीच्या बुटांचा फोटो शेअर केला आहे. सौमित्र यांची ही कविता चांगलीच व्हायरल झाली आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत सौमित्र यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. तर काहींनी सौमित्र यांच्या काव्यात्मक भूमिकेवर टीका केली आहे.