‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले, ‘महाराष्ट्रामध्ये हा क्षण..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट खरोखरच बॉक्स ऑफिसवर चांगलाच भारी ठरला आहे महिना होऊन गेला आणि तरीही हा चित्रपट मात्र थिएटरमध्ये हाऊसफुल्ल वर हाऊसफुल्ल शो गाजवतोय. नुकतेच मुंबई पोलिसांसाठी ‘बाईपण भारी देवा’चे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले. यावेळी ऑन ड्युटी २४ तास असणाऱ्या तब्बल १०० मुंबई पोलिसांनी अडीच तास ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचा मनापासून आनंद घेतला. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या कथानकाचे, कलाकारांचे आणि संपूर्ण टीमचे भरभरुन कौतुक केले. या दरम्यानचा एक व्हिडीओ केदार शिंदेनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

हि पोस्ट शेअर करताना केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘100 डायल केलं तर मदतीसाठी पोलिस हजर होतात! काल 100 पोलिस “बाईपण भारी देवा” सिनेमा पहाण्यासाठी हजर होते. दिवसरात्र सणवार आपल्या सेवेत असलेले काल २।। तास आनंदात होते. सिनेमा संपल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान खुप काही देऊन गेलं. पुरूषांनी हा सिनेमा पाहायला हवा.. हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. शुक्रवार पासून चित्रपट गृहात “बाईपण भारी देवा” फ्लॅट १००/- तिकीटावर पहायला मिळणार आहे. आता पुरूषांची गर्दी नक्कीच होईल. आपल्या आवडत्या स्त्री सोबत सिनेमा पहायला!!!!!’

या व्हिडीओत एक पोलीस अधिकारी चित्रपट पाहिल्यानंतर व्यक्त होताना दिसत आहे. ते म्हणाले की, “‘माहेरची साडी’’ सिनेमानंतर असा महाराष्ट्रामध्ये हा क्षण दुसऱ्यांदाच येतोय. पुरुष एवढ्या मोठ्या संख्येनं सिनेमाला जात नव्हते. तुम्ही या महाराष्ट्राला आणि समाजाला उत्कृष्ट सिनेमा दिला आहे. हा सिनेमा आम्ही पोलिसांना मुद्दाम दाखवला. तोही विशेषतः पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना दाखवला’. दरम्यान उद्यापासून म्हणजेच शुक्रवार ११ ऑगस्ट २०२३ पासून ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पाहणाऱ्या पुरुष प्रेक्षकांसाठी एका खास ऑफरचे नियोजन करण्यात आले आहे. आता हा चित्रपट कोणत्याही थिएटरमध्ये केवळ १०० रुपये तिकीट दरात पाहता येणार आहे. याबाबत स्वतः केदार शिंदे यांनी माहिती दिली आहे.