स्पृहा जोशीने सांभाळली हिवाळी अधिवेशनातील विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये गेली अनेक वर्ष एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि कवयित्री म्हणून कार्यरत असलेली स्पृहा जोशी अत्यंत लोकप्रिय आहे. चित्रपट, नाटक, मालिका अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे कायम मनोरंजन केले आहे. केवळ अभिनेत्री नव्हे तर उत्तम कवयित्री म्हणून प्रेक्षक तिच्यावर प्रेम करतात. तिच्या कविता अत्यंत लक्षवेधी आणि हृदयस्पर्शी असतात. तसेच तिची सूत्रसंचालन करण्याची पद्धतदेखील फारच लाघवी आहे आणि त्यामुळे यंदा राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील विशेष कार्यक्रमात तिला निवेदन करण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमात मिळालेली निवेदनाची संधी स्पृहासाठी विशेष होती. याबद्दल व्यक्त होताना तिने अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये स्पृहाने लिहिलं आहे कि, ‘नागपूरला हिवाळी अधिवेशनादरम्यान सगळ्या मान्यवर आमदारांसाठी आशिष शेलार यांनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी मला ”स्वरोत्सव” या मैफिलीचं निवेदन करण्याची संधी मिळाली. राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या गायनाने आम्ही सगळे प्रेक्षक भारावून गेलो होतो. धन्यवाद श्रीरंग गोडबोले मला ही संधी मला दिल्याबद्दल खूप आभार!’

राज्य विधिमंडळाचं यंदाचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर २०२३ पासून नागपूर येथे सुरू झालं आहे. या अधिवेशना दरम्यान एका विशेष संगीत मैफिलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि महेश काळे यांनी आपल्या सुमधुर आवाजात विविध गाण्यांचे सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर या कार्यक्रमाची निवेदन सूत्र अभिनेत्री स्पृहा जोशीने उत्तरमरित्या सांभाळली. ज्यासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.