‘लोकमान्य’ मालिकेसाठी स्पृहा जोशीने केली भावस्पर्शी गीताची रचना; प्रेक्षकांनी केले कौतुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘लोकमान्य’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरु झाली असताना अगदी अल्पावधीतच हि मालिका सांगतेकडे मार्गस्थ झाली आहे. या मालिकेतून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर आणली गेली. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असे वृत्त समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या मालिकेतील एक नव गाणं प्रेक्षकांसमोर आलंय. विशेष सांगायचे म्हणजे या गाण्याचे बोल स्वतः स्पृहा जोशीने लिहिलं आहे. जी या मालिकेत लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारते आहे.

‘लोकमान्य’ या मालिकेत अभिनेता क्षितिश दातेने लोकमान्य टिळकांची तर अभिनेत्री स्पृहा जोशीने त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका अव्वलरित्या साकारली आहे. स्पृहा एक उत्तम अभिनेत्रीच नव्हे तर एक उत्तम कवयित्री आहे हे आपण जाणतोच. याच कलेच्या जोरावर तिने लोकमान्य मालिकेसाठी एक गीत रचले. जे नुकतेच रिलीज झाले आहे. ‘लोकमान्य’ या मालिकेच्या टीमने सोशल मीडियावर हे गाणे प्रदर्शित केले आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द लोकमान्य टिळक यांच्या जीवनप्रवासाची झलक दाखवणारा आहे.

‘विझत चालल्या या भूमीला स्वराज्य हा उद्गार दिला, मरू घातल्या लाख मनांना अभिमानाचा श्वास दिला…’, असे या गाण्याचे बोल आहेत. हे गीत स्पृहा जोशी लिखित आणि शुभंकर शेंबेकर याने संगीतबद्ध केलेले आहे. तर जयदीप वैद्यने गाण्याला आपला सुमधुर आवाज दिला आहे. कोरसकरिता भाग्यश्री, आदित्य, ऋषिकेश, पुनम यांची साथ लाभली आहे. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकरी या गाण्याचे कौतुक करत आहेत. तसेच या आठवड्यात शनिवारी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने मालिकेचे प्रेक्षक मात्र दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.