हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी सबवरील ‘वागले की दुनिया’ मालिकेत वागले कुटुंबातील दैनंदिन कडू-गोड घटनांचे चित्रण असते. यामध्ये सामान्य माणसाला तोंड द्याव्या लागणाऱ्या काही समस्यांना देखील स्पर्श करण्यात येतो. मालिकेत सध्या स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित कथानक सादर होत आहे. हा एक असा रोग आहे, ज्याने जगभरात अनेक महिलांना पछाडले आहे. या मालिकेत राजेश वागले ही भूमिका निभावत असलेल्या सुमित राघवनने पडद्यावरील त्याच्या पत्नीच्या म्हणजे वंदनाच्या (परिवा प्रणती) व्यक्तिरेखेविषयी आणि आणि ब्रेस्ट कॅन्सरशी ती धैर्याने देत असलेल्या लढ्याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अशा कठीण प्रसंगांमध्ये कुटुंबाने त्या व्यक्तीस आधार देणे किती महत्त्वाचे असते यावर सुमितने विशेष भर दिला.
आगामी कथानकात वंदना स्तनाच्या कर्करोगाशी लढा देताना दिसणार आहे. तिच्या आरोग्याच्या प्रवासातील या चढ-उतारांमध्ये राजेश तिला कशी साथ देतो? या प्रश्नाचे उत्तर देताना सुमित म्हणाला, ‘राजेश हा घराच्या बोटीचा जणू कॅप्टन आहे, जो आपले आई-वडील, मुले आणि पत्नी वंदना या सगळ्यांची काळजी घेतो. हे काम सोपे नाही, पण तो खंबीरपणे आणि काळजीपूर्वक ही जबाबदारी निभावतो. त्याचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे आणि ती जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे, तेव्हा तो तिचा आधारस्तंभ बनतो. तिच्या मनातील भीती, तिच्या चिंता तो शांतपणे ऐकून घेतो. त्यामुळे कॅन्सरशी झुंज देत असलेल्या वंदनाला राजेशचा मोठा मानसिक आधार वाटतो. वंदनाचे औषधोपचार, उपचार प्रक्रिया या दरम्यान तो सतत तिच्या सोबतीस असतो. कठीण प्रसंगात राजेश आपल्या पत्नीला जो खंबीर आधार देतो, ते पाहून हे लक्षात येते की, आयुष्यातल्या अत्यंत कठीण प्रसंगांमध्ये कुटुंबाकडून मिळणारी देखभाल आणि प्रोत्साहन यांचे मोल काय असते!’
यानंतर आपल्या पत्नीला हिंमतीने साथ देणारा पती म्हणून राजेशची व्यक्तिरेखा अनेकांना प्रेरणा देणारी ठरू शकते. या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांनी काय बोध घ्यावा हे सांगताना सुमितने सांगितले कि, ‘एकमेकांशी घट्ट जोडलेले कुटुंब म्हणून एकत्र येण्याच्या आणि आयुष्यातील कठीण प्रसंगाचा एकजुटीने सामना करण्याच्या महत्त्वावर आम्ही जोर दिला आहे. कॅन्सर फार संवेदनशील मुद्दा आहे. असे असूनही, त्याबद्दलची जागरूकता आणि शिक्षण लोकांमध्ये तसे कमीच आहे. ब्रेस्ट कॅन्सरबाबतची भीती आणि शरम यांना फाटा देऊन त्याबद्दल उघडपणे आणि मुक्तपणे चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. यावर भर देत आम्ही महिलांना या बाबत प्रोत्साहन देत आहोत की, जर स्तनामध्ये काही लक्षणे वा फेरफार आढळल्यास त्यांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. स्वतःच केलेली शरीराची तपासणी आणि रोगाचे निदान लवकर झाल्यास यशस्वी उपचारांची आणि बरे होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे संदेश अगदी स्पष्ट आहे: त्याबद्दल बोला, स्वतःची तपासणी करा, मदत घ्या आणि ब्रेस्ट कॅन्सरविरुद्धचा लढा आपण सगळ्यांनी एकत्र मिळून दिल्यास वाटचाल खूप सुसह्य होऊ शकते’.