हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुप्रिया पाठारे हे मराठी कला विश्वातील प्रसिद्ध नाव आहे. मालिका तसेच चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अलीकडेच त्यांच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने निरोप घेतला आहे. अभिनयाशिवाय सुप्रिया त्यांचा मुलगा मिहीरला त्याच्या हॉटेल व्यवसायात मदत करताना दिसतात. त्याच्या हॉटेलचं नाव ‘महाराज’ असून गेल्या २ महिन्यांपासून हे हॉटेल बंद होत. पण आता लवकरच ते पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती सुप्रिया यांनी दिली आहे.
अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफेशनल शेफ आहे. गतवर्षी त्याने ठाण्यात फूड ट्रक सुरू केला आणि कालांतराने काही महिन्यांपूर्वी त्याने हॉटेल सुरु केलं. फूड ट्रकच्या व्यवसायात यश मिळल्यानंतर मिहिरने ठाण्यातच सुरु केलेलं ‘महाराज’ हॉटेल खवय्यांसाठी खास ठिकाण ठरलं. पण, सुप्रिया पाठारे यांच्या आईचे निधन झाल्याने काही दिवस हॉटेल बंद ठेवण्यात आलं. तेव्हा हॉटेल पुन्हा सुरु होणार नाही, अशी चर्चा रंगली. त्यानंतर हॉटेल पुन्हा सुरु झालं पण पुढे काही वैयक्तिक अडचणींमुळे त्यांनी तब्बल २ महिने हॉटेल बंद ठेवलं. ज्यामुळे खवय्ये नाराज झाले.
पण आता २ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रिया पाठारे यांनी पुन्हा एकदा हॉटेल सुरू होत असल्याचं जाहीर केलं आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलंय कि, ‘दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ”महाराज” पुन्हा सुरू होतंय. उद्या ८ तारखेपासून आम्ही पुन्हा एकदा खवय्यांच्या सेवेत सज्ज आहोत. ”महाराज” सुरू होतंय… त्यामुळे नक्की भेट द्या, खेवरा सर्कल, काशिनाथ घाणेकर नाट्यगृहच्या पुढच्या चौकात, रामजी हॉटेलच्या समोर’. सुप्रिया यांची पोस्ट पाहून ‘महाराज’ हॉटेलमधील पदार्थांची चव चाखलेले आणि चव चाखू इच्छित असणारे खवय्ये खुश झाले आहेत.