‘फूड ट्रक ते फूड कॉर्नर…’; सुप्रिया पाठारेंच्या लेकानं ठाण्यात सुरु केलं प्रोफेशनल हॉटेल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे गेली अनेक वर्ष नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर त्यांचा मुलगा हा अभिनय क्षेत्रात कार्यरत नसला तरीही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका चटपटीत विषयामुळे सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर चर्चेत आहे. चटपटीत म्हणायचं कारण म्हणजे मिहीरचा फूड ट्रक आणि आता डायरेक्ट हॉटेल.

होय. सुप्रिया पाठारेंच्या मुलाने फूड व्यवसायात गेली अनेक वर्ष एका फूड ट्रकच्या माध्यमातून खवय्यांना तृप्त केले आहे. हा व्यवसाय उत्तमपणे चालवल्यानंतर आता मिहीरने स्वतःच हॉटेल सुरू केलं आहे. मिहिर हा प्रोफशनने शेफ असल्यामुळे या व्यवसायात तो हळूहळू घट्ट पाय रोवतोय.. परदेशात लोकप्रिय असलेली फूट ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केल्यानंतर ‘मharaj’ या नावाने त्याने फास्ट फूड कॉर्नर सुरु केला आहे. ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूड कॉर्नर हे ठाण्यातील खेवरा सर्कल, रामजी हॉटेलच्या समोर, पोखरण, रोड नं २ वर आहे.

नुकतेच त्याच्या हॉटेलचे उदघाटन झाले आणि यावेळी मराठी कलाविश्वातील अनेक मंडळी हजर होती. मिहीरच्या आईने म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर लेकाच्या नव्या व्यवसायाची माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर मिहीरच्या हॉटेलचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे आणि अनेक खवय्ये त्याच्या हॉटेलात चमचमीत, चटपटीत पदार्थ पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी मिहीरला त्याच्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.