‘आला बाबुराव’ गाण्याचा आणि बाप्पाचा काय संबंध..?; मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान ठिकठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं आणि भक्तीभावनेचं वातावरण निर्माण झालं आहे. या दरम्यान एका प्रसिद्ध अभिनेत्रीला खटकलेल्या गोष्टीवर तिने संताप व्यक्त केला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी ढोल ताशे वाजवत, मोरयाचा नाद करत, गणपतीची गाणी वाजवत लोकांनी गणपती बाप्पाला घरी आणले. मात्र या दरम्यान एका गोष्टीमुळे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरभी भावेने संताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री सुरभी भावे ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिने आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमधून विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘स्वामिनी’ मालिकेमुळे मात्र ती चांगलीच प्रकाशझोतात आली. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यामातून सुरभी तिच्या कामाचे अपडेट्स आपल्या चाहत्यांसोबत आवर्जून शेअर करताना दिसते. शिवाय समाजात घडणाऱ्या चांगल्या, वाईट गोष्टींबद्दल, विषयांवर ती स्वतःचे परखडपणे मत व्यक्त करत असते. अशीच एक स्पष्ट पोस्ट तिने गणेशोत्सवाबाबत केली आहे.

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना सुरभी भावेला एक गोष्ट प्रचंड खटकली आणि ती सोशल मीडियावर व्यक्त केली. सुरभीने स्वतःचा एक फोटो शेअर करून त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं कि, ‘गणपती बाप्पा समोर आत्ता ”आला बाबुराव” हे गाणं ऐकलं आणि माझ्यातली भक्त जागी होण्याआधीच लोप पावली. का हे गाणं वाजवावं वाटलं असेल…?? गाण्याचा आणि बाप्पाचा काय संबंध.. ?’. सुरभीच्या या पोस्टमध्ये दम आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.