हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाकार अभिनयाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. दररोजच्या घडामोडींवर ते परखड मतं मांडत असतात. त्यामुळे कधी कधी त्यांना ट्रोलिंगचाही सामनाही करावा लागतो. पण, त्यालाही ते चोख उत्तरं देतात. सध्या हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेता सुव्रत जोशी यानं त्याच्या पोस्टद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ओटीटीवरील सेक्स व हिंसा या विषयांवर सुव्रतनं एक पोस्ट लिहिली आहे; ज्यावर नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. तसेच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनाही सुव्रत उत्तरं देताना दिसत आहे.
अभिनेता सुव्रत जोशीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत त्यात २ प्रश्न विचारले आहेत. त्याने लिहिलंय, ‘दोन निरागस प्रश्न…
१. राजरोज स्त्रियांवर होणाऱ्या प्रचंड लैंगिक हिंसाचारावर तोंडातून ब्र न काढणारे, OTT वरील काल्पनिक गोष्टीमधील हिंसाचाराविषयी इतके चिंतातुर का असतात?
२. त्यांनी तसे काही search केले आहे का? कारण माझा algorithm मला s*x आणि हिंसा याचा दुरापास्त ही संबंध नसलेले बरेच कार्यक्रम दाखवतो आहे.’ तर सुव्रतच्या या पोस्टवर एकाने प्रतिक्रिया देत म्हटले कि, ‘पण हे मान्य करशील की, कुटुंबाबरोबर बघण्यासारख्या खूप कमी कलाकृती आहेत. विशेषतः लहान मुलांकरिता ज्या सीरिज आहेत, ‘जस्ट अॅड मॅजिक’ किंवा ‘यंग शेल्डन’ यामध्ये जशी क्रिएटिव्हीटी आहे, त्यामध्ये आपले क्रिएटर कमी पडत आहेत. कदाचित सेक्स व हिंसा विषयावरील गोष्टी टीआरपी अधिक वाढवत असतील. जर माझं मत चुकत असेल, तर दुरुस्त करा’.
या कमेंटवर सुव्रतने म्हटले आहे कि, ‘मी तुमच्या मताशी असहमत आहे. मी उद्या तुम्हाला काही शोंची एक यादी देईन; पण तुम्ही तुमच्या कुटुंबाला ज्या गोष्टींची सवय नाही, त्या पाहण्यासाठी (अॅडल्ट नाही; तर दुसऱ्या गोष्टी) प्रोत्साहित केले पाहिजे’. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर विविध कमेंट केल्या आहेत आणि त्याला सुव्रतने प्रतिक्रिया दिल्या आहेत.