हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून धडाकेबाज मिनलची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हि सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तशी ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असल्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून चर्चेत येत असतेचं. पण आजचं कारण खूप खास आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या प्रेमाची कबुली देत प्रियकरासोबतचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. स्वानंदीने गायक आशिष कुलकर्णीला आपला लाईफ पार्टनर म्हणून निवडलं आहे. स्वानंदीने आशिषसोबतचा फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली देत लवकरच दोघे लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. या फोटोसोबत तिने आमचं ठरलं आणि लव्ह असे दोन हॅशटॅग दिले आहेत. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा नुसता पाऊस पडतोय.
स्वानंदीच्या लाईफ पार्टनरविषयी अधिक सांगायचे तर, आशिष कुलकर्णी हा एक गायक आणि गीतकार आहे. तो २००८ साली झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्ये सहभागी झाला होता. शिवाय त्याने अनेक लोकप्रिय म्युझिक बँडबरोबर काम केलंय आणि २०१५ मध्ये त्याने मित्रांसोबत ‘रॅगलॉजिक’ हा संगीत बँड तयार केला. याशिवाय तो २०२० मध्ये ‘इंडियन आयडॉल सीझन १२’मध्येदेखी सहभागी झाला होता.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही प्रसिद्ध मराठी अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी आहे. स्वानंदीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राकडे वाटचाल केली आणि झी मराठीच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून तिने मीनल साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. त्यानंतर स्वानंदी ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसली होती. शिवाय सोनी मराठीवरील ‘सिंगिंग स्टार’ या सिंगिंग रिऍलिटी शोमध्ये तिने विजेतेपद पटकावले आहे. तसेच ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाचे तिने सूत्रसंचालनदेखील केले आहे.