हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात स्त्रीच्या स्वभाव वैशिष्टय़ांवर अनेक टिप्पण्या केल्या जातात. कुणी स्त्रीला माता, जननी म्हणतं तर कुणी तिच्या अन्य रूपांची उपासना करत. काही लोक स्त्रीच्या अस्तित्वाची चेष्टा करतात तर काही मात्र स्त्रीच्या समर्पणाचे पूजन करतात. प्रत्येक माणसाचा स्त्रीच्या असण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. कुणाला ती हवीशी तर कुणाला ती नकोशी वाटते. समाजाच्या रहाटगाड्यात स्त्रीविषयीच्या वेगवेगळ्या भावनांचे मिश्रण आहे. ज्यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंचा समावेश आहे. पण ‘स्त्री’ वेगळीच आहे हे मान्य करणाऱ्या प्रत्येकासाठी एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट लवकरच येत आहे.
स्त्रीच्या गुण, स्वभाव आणि अस्तित्वावर आधारित ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विशेष सांगायचे म्हणजे, प्रसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून पदार्पण करतोय. काही दिवसांपूर्वी त्याने या चित्रपटाची घोषणा करताना एक पोस्ट शेअर केली होती. ज्यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते कि, ‘काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, माझ्या स्वप्नांना बळ दिलं! कदाचित म्हणूनच हे धाडस! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून एक नवीन प्रवास सुरु करतो आहे! आईचा आशीर्वाद आहेच! तुमचा ही असुद्या! घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, जगातील सर्व सर्व स्त्रियांना त्रिवार वंदन करून घेवून येत आहोत … आमच्या नव्या चित्रपटाची घोषणा.. ‘नाच गं घुमा’ भेटूया चित्रपटगृहात १ मे २०२४ ला!’
चित्रपटाचे पटकथा लेखन मधुगंधा कुलकर्णी यांनी केले आहे. तर परेश मोकाशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची कथा महिलांच्या अवतीभवती घडणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींमधून तयार केली आहे. या चित्रपटाची घोषणा करताना याचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता स्वप्निल जोशी आणि सहनिर्मिती अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत करत आहेत. येत्या वर्षात १ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून आतापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळते आहे.