‘मालिकांचं आयुष्य हे TRP वर अवलंबून..’; ‘यशोदा’ बंद होताच अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवरील काही मालिकांचा कमी टीआरपीमूळे बंद होताना दिसत आहेत. प्रेक्षकवर्ग कमी झाल्याचा फटका वाहिनीला चांगला जोरदार बसलाय. अनेक मालिका तर कथानक पूर्ण होण्याआधीच आपला गाशा गुंडाळताना दिसत आहेत. यांपैकी एक म्हणजे यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’. ‘लोकमान्य’ पाठोपाठ आता ही मालिकादेखील अर्धवट कथानकासह प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. याबाबत मालिकेत ‘गोदावरी’ ही भुमिका साकारणारी अभिनेत्री तारका पेडणेकरने सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

यामध्ये तिने मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. सोबत लिहिलंय, ‘❝अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी❞ आज आमच्‍या “यशोदा गोष्‍ट श्यामच्‍या आईची” ह्या मालिकेचा शेवटचा भाग प्रासारित होत आहे. कथानक अर्धवट सोडून मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यायची वेळ आली. ह्याला जबाबदार कोण..? तर (TRP). मालिकांचं आयुष्य हे TRP वर अवलंबून असतं. पुरेसा प्रेक्षक मिळत नसल्यामुळे नाईलाजाने ही कलाकृती बंद करावी लागतेय ह्याच दुःख तर आहेच पण ह्या प्रवासात ज्या प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला, ज्यांनी मालिकेवर, आम्हा कलाकारांवर भरभरून प्रेम केलं, वेळोवेळी कौतुकाने आमची पाठ थोपटली त्या सगळ्यांचे मनापासून आभार’.

‘ह्या काळात अशा उत्तम कलाकृतीची निर्मिती करणाऱ्या धाडसी निर्मात्याचे मनापासून आभार. मला गोदावरी हे पात्र साकार करायची संधी देण्यासाठी आणि ती उत्तम घडवून आणण्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केले त्या सगळ्यांचे आभार. माझ्या संपूर्ण यशोदा परिवाराचे आणि त्यामधील प्रत्येक लहान मोठ्या सदस्याचे मनापासून आभार. त्यांच्यामुळे हा छोटासा प्रवास खूप सुखद आणि छान झाला. अनेक चांगल्या आठवणींची शिदोरी घेवून पुढच्या प्रवासाला निघतेय. लवकरच पुन्हा भेटु एका नवीन मालिकेत, एक नवीन भूमिकेत. तोपर्यंत तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी असू दे.Thank you all’

‘यशोदा’ या मालिकेचा शेवटचा भाग आज शनिवारी १९ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रसारीत झाला. आता त्याजागी नवी मालिका सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र एखादी मालिका कथानक अर्धवट सोडून बंद होणे याहून दुःखाची बाब ती काय… पण यापुढे आपल्याला प्रेक्षकांना नेमकं काय दाखवायचं आहे..? याचा आधीच सारासार विचार करून वाहिनीने मालिका सुरु करावी, अन्यथा पुन्हा मालिकांचे सुरु होणे आणि बंद होणे चालूच राहील.