मराठी चित्रपट पोहोचला हिंदी शोच्या सेटवर; केदार शिंदे म्हणाले, ‘त्यांच्या व्यासपिठावर जावून आपला डंका..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट थिएटरमध्ये यशस्वी ५० दिवस पूर्ण केल्यानंतर अजूनही सिनेमागृहात तग धरून आहे. मराठी चित्रपटांना थिएटर का मिळायला हवे याचे सणसणीत उत्तर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने दिले आहे. उत्तम कथा, सुंदर सादरीकरण, भावस्पर्शी अभिनय आणि कमालीचे दिग्दर्शन या गोष्टींची एकंदरच सांगड घालून या चित्रपटाने संपुन महाराष्ट्र गाजवला आहे. दरम्यान नुकतेच या चित्रपटातील कलाकार ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’ या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. यासंबंधित केदार शिंदेंनी एक पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये केदार शिंदेंनी ‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’ या कार्यक्रमाच्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सोनाली बेंद्रे, गीता माँ, टेरेन्स लुईस यांच्यासोबत बाईपण भारी देवाची टीम दिसते आहे. अभिनेत्री वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीप परब चौधरी आणि केदार शिंदे हि मंडळी यावेळी उपस्थित होती. हे फोटो शेअर करत केदार शिंदेंनी लिहिलंय, ‘काल ‘‘सोनी टीव्ही’’ वाहिनीवरील ‘‘इंडियाज बेस्ट डान्सर ३’’ या कार्यक्रमात ‘‘बाईपण भारी देवा’’च्या टीमला खास निमंत्रित केलं होतं’.

‘फारच अभिमान वाटतो. मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपिठावर जावून आपला डंका वाजवतो तेव्हा ऊर भरून येतो. मला वाटतं याआधी ‘सैराट’ या सिनेमाच्या टीमला कपिल शर्मा शो साठी बोलवलं गेलं होतं. आपल्या मराठी कार्यक्रमात हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो. मात्र, हे आपल्या बाबतीत हिंदीत फार होताना दिसत नाही. याचं शल्य मनात नक्कीच आहे. ‘बाईपण भारी देवा’चं संपुर्ण यश हे तुम्हा मायबाप प्रेक्षकांचं आहे. आम्ही फक्त तुमचे प्रतिनिधी आहोत’. केदार शिंदेंच्या या पोस्टवर मराठी सेलिब्रिटी तसेच अनेक नेटकऱ्यांनी ‘अभिमान वाटतो’ असे म्हणत कमेंट केल्या आहेत.