सिंधुताईंच्या प्रेरणेतून मालिकेच्या टीमने महाराष्ट्रातील 5 शहरांत केले विद्यादान


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘सिंधुताई माझी माई’ या आगामी मालिकेची चर्चा आहे. लाखो अनाथ लेकरांची आई झालेल्या समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्याची प्रेरणादायी संघर्षमय गाथा या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर येत्या १५ ऑगस्ट २०२३ पासून संध्या ७ वाजता ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ ही मालिका प्रसारित होणार आहे. या निमित्ताने मालिकेची संपूर्ण टीम ‘करून विद्यादान करूया सिंधुताईंचा सन्मान’ हा अनोखा उपक्रम राबवित आहे.

कलर्स मराठी वाहिनी अनेकदा विविध सामाजिक उपक्रमांचा भाग होताना दिसते. याहीवेळी आगामी मालिका ‘सिंधुताई माझी माई’च्या निमित्ताने ‘करून विद्यादान करूया सिंधुताईंचा सन्मान’ हा एक विद्यादानाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई, पुणे, अकोला, औरंगाबाद, नाशिक अशा पाच शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. गुरुवारी, १० ऑगस्ट २०२३ रोजी पुण्यामध्ये या कार्यक्रमाची सांगता झाली. सन्मती बाल निकेतन येथे मालिकेची टीम पोहोचली आणि त्यांनी या उपक्रमाचा शेवटचा टप्पा पार पाडला. यावेळी ‘आपल्या घरातलं, आपण वाचलेलं किमान एक तरी पुस्तक अनाथ विद्यार्थ्यांसाठी दान करा’, असं आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केलं.

दरम्यान सिंधुताईंच्या समाजकार्याचा वारसा घेऊन जाणाऱ्या ममता सिंधुताई सपकाळ, श्री. दीपकदादा गायकवाड, श्री. अरुणभाऊ सपकाळ, श्री. विनय सिंधुताई सपकाळ, श्री. मनिष बोपटे, श्रीमती. स्मिता पानसरे, कु. सरोज जांगरा, डॉ. माधवी साळुंखे, मनिषा नाईक, श्री. यश सूर्यवंशी या मान्यवरांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला गेला. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड विराज राजे याठिकाणी उपस्थित होते. या उपक्रमातून निराधार मुलांच्या शिक्षणासाठी शालेय पाठयपुस्तकं, कथा कविता, बालपुस्तकं, कादंबरी, प्रेरणादायी आत्मचरित्रात्मक कथेची पुस्तकं जमवण्यात आली. या उपक्रमातुन जमवलेली पुस्तकं ‘सिंधुताई सपकाळ’ यांच्या आश्रमाला ‘कलर्स मराठी’तर्फे दान करण्यात आली.