‘प्रेमाची गोष्ट’ हिंदी मालिकेचा रिमेक; ट्रोलिंगला प्रत्युत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, ‘रिमेक हा नावाला..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काहीही हा श्री’ या डायलॉगमुळे तुफान लोकप्रियता मिळवणारी जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान ही छोट्या पडद्यावरील लाडकी अभिनेत्री आहे. तिने विविध मालिकांमधून साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पाडताना दिसल्या आहेत. पण मध्यंतरी ती मालिकांमध्ये दिसलीच नाही. तिच्या चाहत्यांना तिने मालिकेत काम करावे असे सतत वाटत होते आणि अखेर दोन ते अडीच वर्षांनी त्यांची ही इच्छा पूर्ण होतेय. अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर अनेकांनी ट्रोलिंगचा सूर धरला. याविषयी आता अभिनेत्रीने आपले स्पष्ट मत मांडले आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री तेजश्री प्रधानने एका मनोरंजन माध्यमाला मुलाखत दिली होती. ज्यामध्ये तिने ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका हिंदी मालिकेचा रिमेक असण्याबद्दल ज्यांनी ट्रोल केले आहे त्यांना अत्यंत स्पष्टपणे प्रत्युत्तर दिलं आहे. तेजश्री म्हणाली, ‘हो… हिंदीचा रिमेक आहे आणि यात काहीच दुमत नाही… ही गोष्ट कोणीही नाकारलेली नाही. पण, कोणीच शब्दश: भाषांतर करत नाही. प्रत्येक भाषेत वेगवेगळ्या भावना असतात. रिमेक असला तरीही तुम्हाला ही मालिका एका नव्या रुपात तुम्हाला पाहायला मिळेल’.

पुढे म्हणाली, ‘मालिका रिमेक असली तरीही प्रत्येक भाषा आणि संस्कृतीचं आपलं एक वैशिष्ट्य असतं. त्यामुळे रिमेक हा नावाला घेतला जाणारा धागा असतो. त्यापुढची बांधणी ही प्रत्येक माणूस करत आहे. अगदी पहिल्या भागापासून तुम्हाला आमच्या मालिकेतील वेगळेपणा जाणवेल हे मी निश्चितपणे सांगू शकते’. अशाप्रकारे तिने मालिकेबाबत असणारे सारे संभ्रम दूर केले आहेत. दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका येत्या ४ सप्टेंबर २०२३ पासून संध्याकाळी ८ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तेजश्री प्रधान, राज हंसनाळे, अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये आहेत.