हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान हि मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. तेजश्रीने नाटक, मालिका आणि चित्रपट यांसारख्या विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. पण तरीही मालिका हे माध्यम तिचे आवडते असल्याचे ती म्हणते. शिवाय प्रेक्षकही तिच्या आगामी मालिकांची आणि भूमिकांची वाट पाहत असतात. येत्या ४ सप्टेंबरपासून तेजश्री स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या नव्या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. याचा प्रोमो अलीकडेच रिलीज झाला असून प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे.
या मालिकेतील नव्या पात्राविषयी बोलताना तेजश्री प्रधान म्हणाली कि, ‘खरंतर मी ठरवून मुद्दाम एक प्रोजेक्ट संपल्यानंतर काही काळ दिसणं टाळते. देव कृपेने प्रेक्षकसुद्धा माझ्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहतात. जसं घरातली एखादी व्यक्ती कामानिमित्ताने बाहेर गेली की घरातले इतर सदस्य तिच्या वाटेकडे डोळे लावून बसेलेले असतात. अगदी तसाच अनुभव एक कलाकार म्हणून मीही घेतलाय. गेले कित्येक दिवस पुन्हा कधी भेटीला येणार अशी वारंवार विचारणा होत होती. तर स्टार प्रवाहवर लवकरच एका नव्या मालिकेतून मी भेटीला येतेय हे सांगताना अतिशय आनंद होतोय. मला सकारात्मक भूमिका साकारायला आवडतं आणि माझी नवी भूमिकादेखील सकारात्मकच आहे’.
‘टेलिव्हिजन हे माझं आवडतं माध्यम आहे. खरतर कोरोनानंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. सोशल मीडियाचं महत्त्वही दिवसेंदिवस वाढतंय. मी या सर्वच गोष्टी पुन्हा एकदा नव्याने अनुभवतेय. प्रामाणिकपणे काम करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आले आणि यापुढेदेखील करेन. प्रेक्षकांचं प्रेम असंच मिळत राहो हीच अपेक्षा. जवळपास १२ वर्षांपूर्वी मी स्टार प्रवाहची तुझं नि माझं घर श्रीमंताचं ही मालिका केली होती. काही दिवसांपूर्वी फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. नव्या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे’. तेजश्रीची आगामी मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ हि हिंदी मालिका ‘ये है मोहब्बते’चा मराठी रिमेक आहे. हिंदी मालिकेत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता करण पटेल मध्यवर्ती भूमिकेत दिसले होते. तर मराठी रिमेकमध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाले मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.