हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत ‘मुक्ता’ या मुख्य भूमिकेत दिसते आहे. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असताना दुसरीकडे तेजश्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजश्री प्रधानच्या आई सीमा प्रधान यांचे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि तेजश्रीचे मातृछत्र हरपले. २०२३ या वर्षाला निरोप देताना तेजश्रीने आईच्या आठवणीत सोशल मिडीयावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे कामाबाबतचे अपडेट देण्याव्यतिरिक्त तेजश्री कायम तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी देखील शेअर करताना दिसते. तेजश्री आणि तिच्या आईचे नाते फार घट्ट होते. त्यामुळे तेजश्रीच्या प्रत्येक कार्यक्रमाला किंवा स्पेशल स्क्रिनिंगला तिची आई आवर्जून उपस्थित असायची. दोघींमध्ये असणारं हे खास बॉण्डिंग सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असे. अनेक मुलाखतींमध्ये तेजश्रीच्या आईने लेकीच्या कामाचं कौतुक केलं आहे. आईच्या निधनानंतर काही काळ तेजश्री सोशल मीडियापासून लांब राहिली होती.
अखेर सरत्या वर्षाचा निरोप घेताना आईच्या आठवणीत व्याकुळ झालेल्या तेजश्रीने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तेजश्रीने स्वतःचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने भावनिक कॅप्शन दिलं आहे. तेजश्रीने लिहिलंय, ‘मला माहित आहे की, तू तिथून मला पाहत आहेस. तू कायम माझ्याबरोबर आहेस हे मला ठाऊक आहे आणि याच विश्वासाने मी माझं यापुढचं संपूर्ण आयुष्य जगत राहणार आहे’. तेजश्रीच्या या पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करत तिला धीर देताना दिसत आहेत.