हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘होणार सून मी ह्या घरची’मधील ‘जान्हवी’ ते ‘अगंबाई सासूबाई’मधील ‘शुभ्रा’ आणि अशा बऱ्याच विविध ढंगाच्या भूमिका अव्वलरित्या साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान आता पुन्हा एकदा नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत दिसणार आहे. साधारण २ वर्षांच्या ब्रेकनंतर तेजश्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मध्यवर्ती भूमिकेत काम करताना दिसणार आहे. स्टार प्रवाह वर येत्या ४ सप्टेंबर २०२३ पासून ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका सुरु होते आहे. या मालिकेत ती ‘मुक्ता’ हे पात्र साकारताना दिसणार आहे.
तेजश्री साकारत असलेली ‘मुक्ता’ नेमकी कशी आहे..? तिचा स्वभाव कसा आहे..? याबाबत बोलताना अभिनेत्रीने सांगितले कि, ‘हे पात्र प्रेक्षकांना नक्की आवडेल. प्रत्येकाला आवडेल असा तिचा स्वभाव आहे. मुक्ताची आई शाळेतील उप मुख्याध्यापिका आहे. त्यामुळे आईला घाबरणारी आणि बाबांची ती खूप लाडकी आहे. चुकणारी, हसणारी, रडणारी आणि सर्वांना सांभाळून घेणार अशी आहे ही मुक्ता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या तिच्या आयुष्यात प्रचंड सकारात्मक आहे’.
पुढे म्हणाली, ‘मुक्ताला आई- बाबांचा धाक असला, तरी आपलं मत ती फार मोकळेपणाने मांडते. ‘‘जर कोणतीही व्यक्ती आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार करणार असेल, तर ते प्रेम आहे’, अशी मुक्ताची स्वतःची अशी वेगळी प्रेमाची व्याख्या आहे’. दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका येत्या सोमवारपासून संध्याकाळी ८ वाजता स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान, राज हंसनाळे आणि अपूर्वा नेमळेकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तर शुभांगी गोखले आणि संजीवनी जाधव यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. त्युमुळे मालिकेबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.