‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून तेजश्री झाली भावुक; म्हणाली, ‘थोडं व्यक्त व्हावंसं वाटलं…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ सारख्या मालिका आणि विविध मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःची एक जागा निर्माण केली आहे. अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून तेजश्रीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. तिच्या नव्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यानिमित्त तिने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधानने आज थोडं व्यक्त व्हावंसं वाटलं अशी पोस्ट करत लिहीलं आहे की, ‘कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानू..? तब्बल अडीच वर्षानंतर television वर पुन्हा परतले.. तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि पटकन म्हणतं “आम्हाला तू आमच्या घरातलीचं वाटतेस tv मध्ये पाहिल्यावर” … तेचं आपलं घरातलं माणूस अडीचं वर्षानंतर परत यावं, आपण त्याच्या गेल्या दिवसापासून परत येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून रहावं, आणि घरी परतलेल्या “त्या” माणसाला तुमचे ते वाट पाहणारे डोळे पाहून भरूनचं यावं…. तसचं काहीस माझ्या मनाचं झालयं, आज पहिल्या भागाला (episode ला) तुम्ही दिलेला प्रतिसाद कळल्यानंतर..’

पुढे लिहिलंय, ‘इतकी वर्ष कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहीले.. पडले, धडपडले, पुन्हा उठले .. आधाराला फक्त काम होतं… शाश्वत फक्त काम होतं , इतकी वर्ष त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही. आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं… सांगावसं वाटलं , “मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या ‘त्या’ अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता, जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या ‘त्या’ अश्रुच्या थेंबाची..

जो कधी लक्ष्मी साठी, कधी जान्हवी साठी, कधी शुभ्रासाठी आणि आता मुक्ता साठी ढळतो.. “ आणि हिचं जाणीव सातत्याने पोटतिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे , या पुढे ही देत राहील. पुन्हा एकदा … मनापासून आभार.. असेचं कायम माझ्या पाठीशी रहा. बाकी #Happy Life आहेचं’.