अहोभाग्यच! तेजस्विनी पंडित साकारतेय राजमाता जिजाऊसाहेबांची भूमिका; म्हणाली, ‘आनंदाहून जास्त जबाबदारी..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आजवर अनेक सिनेमांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ अभिनयातून नव्हे तर निर्मिती क्षेत्रात देखील तेजस्विनीने चांगले काम केले आहे. यानंतर आता तेजस्विनी पंडित एका ऐतिहासिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे आणि या चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत झळकणार आहे. याबाबत तेजस्विनीने आनंद व्यक्त केला आहे

अभिनेत्री तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल म्हणाली, ‘’ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य – स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर अटल राहिल्या. कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजेच क्रांती होय !! अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली ह्याबद्दल मी अनुजा ताईंची शतशः आभारी आहे’.

‘ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूर दृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही .अशा ह्या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच !’ तेजस्विनी या भूमिकेबाबत जितकी उत्सुक आहे तितकेच या भूमिकेत तिला पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.