तेजस्विनी पंडितने पुण्यात सुरु केलं मिडनाईट सलोन; राज ठाकरेंच्या हस्ते केलं ग्रँड ओपनिंग


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी कला क्षेत्राव्यतिरिक्त विविध क्षेत्रात पदार्पण करताना दिसले. कुणी कपड्यांचा व्यवसाय सुरु केला, तर कुणी दागिन्यांचा. अनेक कलाकार हॉटेल व्यवसायात देखील उतरल्याचे पहायला मिळाले. अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर, महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या, अभिनेता निरंजन कुलकर्णी, श्रेया बुगडे, अनघा अतुल या कलाकारांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केले. आता या व्यावसायिक कलाकारांच्या यादीत तेजस्विनी पंडितचे नावदेखील जोडले गेले आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अनेक प्रेक्षकांच्या मनावर आधीच आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. यानंतर आता एका नव्या व्यवसायाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या भेटीस आली आहे. तेजस्वीनीने नुकतंच पुण्यात आलिशान सलोन सुरू केलं आहे. जे मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारं पुण्यातील पहिलं सलोन असणार आहे. त्यामुळे या सलोनला ‘एम टू एम’ असं नाव देण्यात आलं आहे. तेजस्विनीच्या सलोनचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं.

याविषयी स्वतः अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय कि, ‘माननीय राज ठाकरे साहेब तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात यासाठी तुमचे खूप खूप आभार! ‘एम टू एम’ हे पुण्यातील पहिलं मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारं सलोन आहे. तुम्ही सुद्धा नक्की या!’.

तेजस्विनीने हा नवा व्यवसाय पूनम शेंडे आणि त्यांच्या टीमसह मिळून सुरू केला आहे. एक अत्यंत वेगळा मार्ग निवडत तिने वेगळ्या क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या संपूर्ण टीमची झलक पाहायला मिळत आहे.