सायली प्रतिमाची भेट होणार..? नकळत आईने दिला लेकीला आशीर्वाद; प्रोमो झाला व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका चांगलीच रंगात आली आहे. सध्या या मालिकेत अर्जुनच्या वाढदिवसाचा सीक्वेन्स सुरू आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमूळे सायली अर्जुनला एकमेकांच्या वाढदिवसाबद्दल काहीच माहिती नाही. दरम्यान सासूबाईंकडून सायलीला अर्जुनच्या वाढदिवसाची माहिती मिळते आणि सुभेदार कुटुंबीयांना खोटं प्रेम दाखवण्यासाठी हे जोडपं एकत्र वाढदिवस साजरा करणार आहेत. तर दुसरीकडे प्रतिमा आणि सायली समोरा समोर येऊन माय लेकीला नकळत आशीर्वाद देणार आहे.

मालिकेत दुसऱ्या बाजूला रविराज किल्लेदार प्रतिमा पुन्हा येईल या आशेवर बागेत फुलझाडांची लागवड करताना लेकीला सांगतात कि, ‘बायकोच्या आठवणीत मी ही रोपं लावतोय’. अद्याप प्रतिमा जिवंत आहे आणि सायली ही प्रतिमाची खरी लेक असल्याचं सत्य समोर आलेलं नाही. मालिकेत आतापर्यंत प्रतिमा जितक्यावेळा दिसली तितक्यावेळा तिच्या डोक्यावर ओढणी आहे. ती सर्वांपासून लपून वावरताना दिसते. अशातच आगामी भागात प्रतिमा आश्रमातील मुलांना भेटण्यासाठी कुसूमच्या घरी जाताना दिसेल. सर्वांची भेट घेतल्यावर ती पुन्हा माघारी निघताना कुसूम तिला अडवणार आणि सायलीला भेटून जा असा आग्रह करणार.

मात्र, प्रतिमाला तिची खरी ओळख समोर येऊन द्यायची नसल्यामुळे सायलीचं नाव ऐकताच ती पळ काढताना दिसणार आहे. सायली आश्रमातील मुलांसह वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षाने पोहोचते. तर रिक्षा चालकाने दिलेले सुटे पैसे तिच्या हातातून खाली पडतात. यामुळे सायली खाली वाकून पैसे गोळा करू लागते आणि इतक्यात प्रतिमा लगेच लेकीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देते. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रसंगादरम्यान सायली आणि प्रतिमा एकमेकांसमोर आल्या पण मायलेकीची भेट होणार का..? हा अनुत्तरित राहिला. पण लवकरच येत्या काही भागांमध्ये मिळणार आहे.