आले आले हो…. ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानूशालीच्या घरी जल्लोषात बाप्पाचं आगमन


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अखेर वर्षभर वाट पाहिल्यानंतर आज बाप्पा पुन्हा एकदा आपल्या भाविकांच्या भेटीसाठी आले आहेत. आजपासून पुढचे दहा दिवस राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळणार आहे. आज गणेश चतुर्थीनिमित्त अनेकांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. केवळ सर्वसामान्य नव्हे तर अनेक सेलिब्रिटी मंडळी आणि नेते मंडळींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानूशालीच्या घरी देखील बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले आहे.

गणेशोत्सवामुळे सर्वत्र एक वेगळाच आनंद आणि उत्साह पहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया….मंगलमूर्ती मोरया….’ हा जयघोष करत आज अनेकांच्या घरी बाप्पाचे दणक्यात स्वागत करण्यात आले. अभिनेता अमित भानूशालीने देखील मोरयाचा नाद करत ढोल ताशांच्या गजरात आणि अगदी धूमधडाक्यात आपल्या घरगुती गणेशाचे आगमन केले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी अमित त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसला. हातात बाप्पाची मूर्ती असलेल्या अमितच्या चेहऱ्यावर अत्यंत वेगळे तेज आनंद पहायला मिळाला.

ढोल ताशाच्या गजरात अमित भानुशालीच्या घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालं. ‘गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात अमितने आपल्या कुटुंबासोबत घरच्या बाप्पाचं स्वागत केलं. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलगादेखील पहायला मिळाला. या जल्लोषाचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. केवळ अमित नव्हे तर इतरही अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे आणि त्याचेही व्हिडीओ तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायला झाले आहे.