पुण्याच्या ट्रॅफिक जॅममध्ये 85 वर्षीय आईसोबत अडकला अभिनेता; संतापून म्हणाला, ‘एकही वाहतूक पोलीस..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या पावसाचे दिवस सुरु असल्यामुळे पाणी साचणे, दरडी कोसळणे अशा घटनांमुळे वाहतुक कोंडी होताना दिसत आहे. पुण्यासारख्या शहरात तर सदर दोन दिवसाला वाहतूक कोंडीची चर्चा होत असते. दरम्यान पावसामुळे याचे प्रमाण आणखीच वाढले असून नुकताच या ट्रॅफिक जॅमचा अनुभव अभिनेता सागर तळाशीकरला आला आहे. तब्बल ५ तास हा अभिनेता त्याच्या ८५ वर्षीय आईसोबत पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकला होता. याचा अनुभव सांगताना त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. सध्या सागर ‘ठरलं तर मग’ या मालिकेत ‘रविराज’ हि भूमिका साकारताना दिसत आहे.

अभिनेता सागर तळाशीकरने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुक लाईव्हमधून हा अनुभव शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिलं आहे की, ‘मित्रहो, हा काल दिनांक २४ जुलैचा व्हिडीओ आहे. मी दुपारी १.३० ते ७.३० पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकलो होतो. ८.३० ला पुण्यात घरी पोहोचलो. म्हणजे पुण्यात शिरल्यावर आम्ही एकाच पुलावर ५ ते ६ तास होतो. यादरम्यान ७०० किंवा ८०० मीटर मागे पुढे झालो असू इतकेच. कुणीही तिथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी नव्हते. माझी ८५ वर्षांची आई जिचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आहे. ती पण न खाता बरोबर होती. तिच्या शुगर वगैरे इतर गोळ्यापण घ्यायच्या होत्या’.

‘असेच आणखी कितीतरी वृद्ध, स्त्रिया, मुलं, पेशंट्स असतील त्यांनी करायचं काय? स्त्रियांचे बाथरुमच्या प्रॉब्लेमचं काय करायचं? काय झालंय हे सांगायलाही कुणी नाही आणि ७.३० ला तिथून सुटलो तेव्हा बघितलं, तर तिथं कुणीही वाहतूक सुरळीत व्हायला मदत व्हावी म्हणून दिशा दर्शविणारा एकही वाहतूक पोलीस नव्हता, कुणी कार्यकर्तेपण नव्हते, भयंकर आहे हे. शक्य असल्यास ही पोस्ट शेअर करा. चुकून काही करावसं वाटलं संबंधितांना, तर इतरांना उपयोगी पडेल. शक्यता कमीच आहे, पण तरी… सर्वांचे मनःपूर्वक आभार. आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आई उत्तम आहे’. या वाहतूक कोंडीत केवळ सागर नव्हे तर तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील अडकली होती. तिनेदेखील इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटले होते कि, ‘जर तुम्ही पुणे ते मुंबई हा प्रवास करणार असाल, तर कृपया करू नका! संपूर्ण घाट जाम आहे’.