‘समोरच्याला काय खुपतंय यापेक्षा…’; अमृता खानविलकरच्या ‘त्या’ फोटोचे कॅप्शन चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अमृता खानविलकर मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ सौंदर्याच्या जोरावर नव्हे तर अभिनय, नृत्य अशा विविध कलागुणांच्या जोरावर तिने कला सृष्टित स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. अमृताने अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. पण प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात तिने साकारलेली चंद्रा प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे. शिवाय अमृता सोशल मीडियावर फार सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

अभिनेत्री अमृता खानविलकरने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर तिचा गुलाबी साडीतील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या शोमधील काटेरी प्रश्नांच्या खुर्चीत बसलेली दिसत आहे. येत्या भागात ती अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसेल. या शोमध्ये आपल्या आयुष्यातील कुण्या एका ‘त्या’ व्यक्तीला फोन करण्याची संधी मिळते आणि बहुदा अमृताचा त्याच सेशनमधील हा फोटो आहे. ज्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘कधी कधी समोरच्याचं काय “खुपतंय” ह्या वर चर्चा करण्या पेक्षा आपला मूल्यवान वेळ त्यात आपण घालवायचा का नाही हे समजून घेणं जास्त महत्वाचं असतं. peace of mind everything’.

अमृताने शेअर केलेल्या या फोटोवर तिचे चाहते मोठ्या संख्येने लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या फोटोवरील एक कमेंट फारच लक्षवेधी आहे. ज्यामध्ये असं लिहिलंय कि, ‘अमृता मॅम कुणाला फोन लावला तुम्ही..?’ यावर रिप्लाय देताना अमृताने म्हटले, ‘माझ्या आयुष्यातील ”ती”ला.. जरूर बघा’. शिवाय अमृताने असेही लिहिले आहे कि, ‘आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ती असते… आपल्यावर जीव ओवाळून टाकणारी … आपल्याला सांभाळणारी…. आपल्या मागे खंबीरपणे उभी राहणारी.. कधी ती आई असते, कधी मैत्रीण, कधी बहीण तर कधी आपली छकुली.. अश्या तुमच्या आयुष्यातल्या “ती”ला तुम्हाला काई सांगायचे आहे..?’ अमृता शोमध्ये नेमकं कुणाला फोन करताना दिसणार याबाबत मोठी उत्सुकता आहे.