हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडच्या बड्या स्टार्सच्या बिग बजेट सिनेमांना टक्कर देणारा मराठमोळा चित्रपट ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. हा चित्रपट चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करतोय. आजही या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा एक अत्यंत भावनिक असा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनाला भावुक करणाऱ्या या ट्रेलरमध्ये आयुष्यात जिवाभावाची मैत्री किती महत्वाची असते, हे दिसतेय.
जीव लावणाऱ्या मैत्रिणी- सख्या सोबती असतील तर सगळया अडचणी फारच क्षुल्लक वाटू लागतात. आपल्या नात्यांची वीण घट्ट करणारा हा ट्रेलर मनाला हळुवार स्पर्शून जातो आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता हेमंत ढोमेने अगदी यशस्वीरीत्या केले आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना हेमंत ढोमे म्हणाला, ‘यापूर्वीच आम्हाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे. मुळात आता हा चित्रपट हा आमचा राहिला नसून हा तुम्हा सर्वांचा झाला आहे. आयुष्यात मैत्री असेल तर खूप गोष्टी सरळ, सोप्या होतात. मग ते नाते कोणतेही असो. आई मुलीचे, सासू सुनेचे अथवा नवरा बायकोचे. मैत्री असणे खूप महत्वाचे. कोणत्याही अडचणींवर मैत्रीची हळुवार फुंकर मारली की आपोआप सगळं सुरळीत होते. हा नवीन ट्रेलर पाहून तुम्हालाही तुमच्या घनिष्ट मैत्रीची आठवण आल्या वाचून राहणार नाही. आतापर्यंत प्रेक्षकांनी जे प्रेम दिले असेच प्रेम यापुढेही द्याल याची खात्री आहे. ज्यांनी ‘झिम्मा २’ पाहिला त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांनी पाहिला नाही त्यांनी आवर्जून हा चित्रपट पाहावा’.