‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत. विविध विषय आणि विविध कथानकांसह या मालिका प्रेक्षकांना नवी ऊर्जा देण्याचे काम करत आहेत. विविध विषयांमध्ये अध्यात्मिक मालिका प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेताना दिसल्या. ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘गाथा नवनाथांची’ आणि ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. दरम्यान ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

विविध मालिकांची नवी सुरुवात होण्यासाठी सोनी वाहिनीवरील जुन्या काही मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे. ज्यामध्ये ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेचा समावेश आहे. शनिवार दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. ‘सोनी मराठी’वर हि मालिका २८ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झाली होती. वर्ष पूर्ण होण्याआधीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. एकवीरा देवीचा महिमा सांगणारी ही मालिका अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.

या मालिकेत अभिनेत्री मयूरी वाघ आणि अमृता पवार या मुख्य भूमिकेत होत्या. मयूरी वाघाने एकवीरा आईची तर अमृताने तानियाची भूमिका यात साकारली होती. दोघींच्याही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. पण आता मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ज्याबाबत प्रेक्षकांनी दुःख व्यक्त केलं आहे. ‘सोनी मराठी’च्या सोशल मीडिया पेजवरून मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. यावर नेटकऱ्यांनी मालिका पुढे सुरु राहायला हवी होती असे म्हटले आहे.