अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत..? ‘जवान’ पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता किरण माने हे सोशल मिडीयावर कायम सक्रीय असतात. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांवर ते अगदी थेट भाष्य करत विविध पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून किरण मानेंनी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या कौतुकाचे वारंवार पूल बांधणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. शाहरुखचा नुकताच रिलीज झालेला ‘जवान’ हा चित्रपट किरण मानेंनी पाहिला. यानंतर आता त्यांनी एक खरमरीत पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी लिहिलंय, ‘…”जवान”मध्ये शाहरूखच्या आवाजात एक सनसनीत शेर हाय, “उसूलों पे जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है… जो ज़िन्दा हों, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है!” … हा शेर आजच्या परिस्थितीत लै लै लै मोलाचा संदेश देऊन जातो भावांनो. जवा- जवा आपल्यावर दडपशाहीचं सावट येतं… आपल्या पूर्वजांनी झगडून, लढा देऊन मिळवलेलं, आपलं व्यक्त होन्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं… आपल्यावर पिढ्या न् पिढ्या असलेल्या मानवतेच्या, समानतेच्या, बंधुभावाच्या संस्कारांवर घाला घातला जातो… तवा बिनधास्त नडायला पायजे, भिडायला पायजे… ”टकराना ज़रूरी है”! तोच आपल्या जिवंत असल्याचा पुरावा असतो. नायतर सगळं सहन करत, मुकाट जगनं मुडद्यापेक्षा बदतर असतं!’

‘…शायरीच्या दुनियेत बेताज बाहशाह असलेल्या वसीम बरेलवींचा एक दिवस फोन वाजला, “हॅलो, वसीमजी, मी शाहरूख खान बोलतोय. तुमचा हा शेर मला कायम प्रेरणा देतो. यावेळी तो माझ्या सिनेमात वापरायला मला तुमची परवानगी हवीय”. वसीमभाई म्हन्ले, “शाहरूख बेटा, तू मला आवडतोस. परवानगी देईन, पण एका अटीवर. हा शेर मी लिहून देईन, तसाच्या तसा सिनेमात तू तुझ्या आवाजात म्हणायचास”. शाहरूखनं नम्रपणे हसून होकार दिला. दोन ओळींसाठी एवढा मोठ्ठा कलाकार स्वत: फोन करून विनयशीलतेनं परवानगी मागतो याचं बरेलवींना लैच नवल वाटलं. …खरंतर ज्यांना शाहरूखचं अफाट वाचन, तिक्ष्ण बुद्धीमत्ता, विवेकी विचारसरणी, समाजभान याविषयी माहिती आहे, त्यांना या गोष्टीचं लै नवल वाटनार नाय. असे कलावंतच न डरता, मागे न हटता, पाठीचा कणा ताठ ठेवून जगतात’.

‘नायतर बाकी आज आपल्या सिनेमाक्षेत्रात बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत वो. फायद्यासाठी व्यवस्थेचे पाय चाटत लाचार जगनार्‍या… जातीधर्मांत द्वेषाचं विष पसरेल असा इतिहासाचा विपर्यास करनारे सिनेमे काढनार्‍या… भ्रष्ट नेत्यांकडून फंडिंग उकळत प्रोपोगंडा फिल्मस् काढनार्‍या सुमार दर्जाच्या कलाकारांची मराठी-हिंदीत सद्दी आहे. अशा नट-दिग्दर्शकांची ठरवून ‘हाईप’ केली जाते. पात्रता नसताना अनेक सरकारी पुरस्कार, पदं देऊन प्रेक्षकांवर लादलं जातं. हे पाहून कवा-कवा निराशा यायची. अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत? असा प्रश्न पडायचा… पन प्रेक्षक येडे नसतात. पितळ आनि सोनं, काच आनि हिरा यातला फरक कळतो त्यांना… म्हनूनच त्यांनी ”जवान”ला ठरवून डोक्यावर घेतलं. शाहरूख खान नांवाच्या अस्सल भारतीय कलावंताला भरभरून प्रेम देऊन प्रेक्षकांनी हे दाखवून दिलं की, बास झालं आता. आम्हाला मूर्ख समजू नका… ”हम ज़िन्दा है… और ज़िन्दा नज़र आना चाहते है!'”