‘झिम्मा 2’मध्ये रिंकू साकारतेय सरळ पण प्रेमळ ‘तानिया’ची भूमिका; पोस्टर आले समोर


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट कधी एकदा रिलीज होतो असं प्रेक्षकांना झालं आहे. अलीकडेच या चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झाला. ज्यामध्ये ‘झिम्मा २’मधील कलाकारांची झलक पहायला मिळाली. जी पाहून ‘झिम्मा’ या चित्रपटाप्रमाणे आता ‘झिम्मा २’सुद्धा चित्रपटगृह गाजवणार असे दिसत आहे. मुख्य म्हणजे यावेळी हा आनंदाचा प्रवास २ नव्या मैत्रिणींसोबत घडणार आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटात शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरु यांची एंट्री झाली आहे. दरम्यान रिंकू राजगुरुच्या भूमिकेचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या पात्राचे पोस्टर अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘सांगता येत नाही ते करायचंच कशाला..??? सरळ पण प्रेमळ… ”झिम्मा २”ची नवी खेळाडू!! सुनबाई… तानिया! ”झिम्मा २”, २४ नोव्हेंबर पासून तुमचे आमचे REUNION चित्रपटगृहात…’. या पोस्टरमध्ये रिंकू राजगुरूने ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. शिवाय तिच्या हातात पर्स दिसतेय. हि पर्स धरून उभी असलेली रिंकू चित्रपटात ‘तानिया’ हे पात्र साकारते आहे. ही तानिया निर्मिती सावंत साकारत असलेल्या पात्राची सूनबाई आहे. ज्याची झलक टीझरमध्ये पहायला मिळाली.

चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव यांच्यासोबत रिंकू राजगुरु आणि शिवानी सुर्वे यांची नवी एंट्री झाली आहे. तर ‘झिम्मा’ चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर झळकला होता आणि याहीवेळी ही ट्रिप नेण्याची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर आहे. सध्या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या उत्सुकतेचे कारण बनले आहेत.