प्रसादच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा; ‘जिलबी’ वाढवणार प्रेक्षकांसोबतच्या नात्यातील गोडवा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता प्रसाद ओक गेल्या वर्षपासून चांगलाच फॉर्मात आहे. एक अभिनेता म्हणून तो कमाल आहेच, शिवाय त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ आणि अभिनित ‘धर्मवीर’बद्दल तर बोलू तेव्हढं कमीचं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस असं काही गाजवलं की बस्स!! यानंतर प्रसादचं प्रेक्षकांशी असलेलं नातं आणखीच बहरत गेलं आहे. अशातच आता प्रसाद एका नव्या चित्रपटातून एक नवी भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘जिलबी’ असे आहे.

अलीकडेच अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचे नाव ‘जिलबी’ असे आहे. अत्यंत वेगळ्या शीर्षकाचा हा चित्रपट नक्की काय कथानकावर आधारित आहे हे नक्की सांगता येणार नाही. पण हा चित्रपट १००% मनोरंजन करणार अशी हमी निर्मात्यांनी दिली आहे. प्रसादने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती त्याच्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

यावेळी प्रसादने ही पोस्ट शेअर करताना ‘जिलबी’ या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील फोटो शेअर केला आहे. सोबतच क्लॅपचा देखील फोटो त्याने शेअर केला आहे. प्रसादने या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले कि, ‘नवा चित्रपट…!!! “जिलबी” चित्रीकरण आजपासून सुरु…!!!” गणपती बाप्पा मोरया…!!!’ माहितीनुसार, या चित्रपटात प्रसाद ओकसोबत, स्वप्नील जोशी आणि शिवानी सुर्वे यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडीत करणार आहेत. तर नितीन कांबळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.