हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचा लाडका कॉमिक शो ठरला आहे. या शोमधून अनेक कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहेत. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले. अभिनय कौशल्य आणि विनोदाचं परफेक्ट टायमिंग या जोरावर त्यांनी मराठी कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. यामुळे आज समीर चौघुलेंची लोकप्रियता पाहण्याजोगी झाली आहे. अलीकडेच एका युट्युब चॅनेलला त्यांनी एक मुलाखत दिली. ज्यामध्ये पुरुषांनी स्त्रीपात्र साकारण्याबद्दल चौघुलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हास्य अभिनेता समीर चौघुले यांनी ‘स्वयं टॉक’ या युट्यूब चॅनलला अलीकडेच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. ज्यामध्ये विनोदाच्या नावाखाली अंगविक्षेप होतो, असं तुम्हाला वाटतं का..? हा प्रश्न विचारण्यात आला. यावर चौघुलेंनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाबद्दल अप्रत्यक्षरित्या भाष्य करताना म्हटले कि, ‘पुरुष पात्रांनी स्त्री पात्र करणं म्हणजे याबद्दल तुमचा रोख कोणत्या कार्यक्रमाकडे आहे, हे मला समजलं. पण मला वाटतं की, त्यांच्या कार्यक्रमाचे स्वरुप खूप वेगळे आहे. त्यांच्या कार्यक्रमाचे स्वरुप हे चित्रपटाचे प्रमोशन करणे असे आहे’.
पुढे म्हणाले, ‘आमच्या कार्यक्रमाचे स्वरुप त्यापेक्षा फार वेगळे आहे. आमचा कार्यक्रम एक गोष्ट मांडतो. अशा आम्ही एका दिवसाला तीन गोष्टी मांडतो. आठवड्यातून ४ दिवस म्हणजे आम्ही एकूण १२ गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडतो. आमच्याकडे तो प्रकार फार चालत नाही. आमच्याकडे जशी कथा असेल त्याप्रमाणे आम्ही मांडणी करतो. कार्यक्रमात जे पात्र येतात, जी तुम्हाला हसवतात. ती पात्र ज्या त्या लेखकाने लिहिलेल्या कथेप्रमाणे आलेली असतात’. अशाप्रकारे चौघुलेंनी दोन्ही कार्यक्रमांमध्ये असलेला फरक स्पष्ट करत आपले मत प्रकट केले आहे.