गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘या’ मराठी कलाकारांनी केला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी पक्षप्रवेश केल्याचे आपण पाहिले. यामध्ये अनेक दिग्गज मंडळींचा समावेश आहे. यानंतर नुकताच ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि त्याच्यासह अन्य काही मराठी कलाकारांनीदेखील पक्षप्रवेश केला आहे. या कलाकारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची निवड केली आहे. मराठी कलाकारांचा शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश होणं ही बाब सर्वांसाठीचं आश्चर्यकारक ठरली आहे. हार्दिक जोशी, अक्षया देवधर, अदिती सारंगधर, माधव देवचके, प्रतीक पाटील आणि अमोल नाईक या कलाकारांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान अभिनेता हार्दिक जोशीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतचं प्रवेश का केला..? याचं कारण सांगितलं आहे. नामवंत वाहिनींनी दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक जोशीने शिवसेनेत प्रवेश का केला याची कारणं सांगताना म्हटले कि, ‘शिव चित्रपटसेना ही संघटना आज सुरू करण्यात आली. या संघटनेतुन कलाकारांसाठी काम करण्यात येणार आहे. सुशांत शेलार या संघटनेचा अध्यक्ष आहे. सुशांतच्या मार्फत आम्ही या संघटनेत सामील झालो. प्रत्येकाला वाटत असतं की आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत त्यातील लोकांना आपण मदत केली पाहिजे पण त्याचा मार्ग सापडत नाही. तो मार्ग आज मला मिळाला आहे असं मला वाटतं’.

पुढे म्हणाला, ‘कोणत्याही प्रकारचं राजकारण नसणारी ही संघटना आहे. त्यामुळे आम्ही सर्व कलाकार एकत्र येऊन मनोरंजन सृष्टीतील फक्त कलाकार नाही तर जे संपूर्ण युनिट आहे त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आजच आम्ही या संघटनेचा शुभारंभ केला. आता या चित्रपट संघटनेमार्फत आम्ही हळूहळू विविध योजनाही तयार करत जाऊ. कलाकारांच्या आणि मनोरंजन सृष्टीतील ज्या समस्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा योग्य मार्ग आहे असं मला वाटलं आणि म्हणूनच यात सहभागी झालो’.