‘हा प्रवास भावनिक होता…’; ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला निरोप देताना अभिनेत्री झाली भावुक


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता प्रेक्षकांचा निरोप घेण्यास सज्ज झाली आहे. नुकतच या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून सेटवरील शेवटचा दिवस कलाकारांनी साजरा केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीवर असलेली ही मालिका प्रचंड गाजली. प्रेक्षकांनी या मालिकेला, मालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम दिले आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट गोड असला तरी निरोप घेणे कलाकरांना आणि प्रेक्षकांना जड जात आहे.

मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडल्यानंतर आता मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री प्रांजल आंबवणेनेदेखील नुकतीच एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये तिने लिहीलंय, ‘सदैव आठवणीत राहील अशी ”ठिपक्यांची रांगोळी”… गेले २ वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या आमच्या रांगोळीच्या प्रवासाचा कालचा शेवटचा टप्पा… शेवटचं शूट… ठिपक्यांच्या रांगोळीने नेत्राला (प्रांजलला) काय दिलं..? तर रसिकांचं खूप सारं प्रेम, एक नवी ओळख दिली. सर्व प्रथम आभार ”स्टार प्रवाह” आणि नरेंद्र मुधोळकर सर, आमच्या निर्मात्या रुपाली गुहा, प्रोजेक्ट हेड सूचित शब्बीर, दिग्दर्शक गिरीश वसईकर/सचिन सर, परेश सर यांचे…’.

‘ग्रे शेड रंगवायची, ती ही लोकप्रिय अशा ‘शप्पू’ (शशांक-अप्पू)च्या जोडी समोर आणि कसलेल्या अशा सर्व नामांकित अभिनेत्यांच्या ”कानिटकर कुटुंबासमोर” या गोष्टीचे काहीसे दडपण घेऊनच मी इथे आले. पण अभिनयातले बारकावे, भूमिकेचा अभ्यास कसा करावा..? यासाठी लीना ताई, सुप्रिया ताई, सारिका ताई, शरद दादा, मंगेश सर, अतुल दादा सर्वांचीच खूप मदत झाली. ज्ञानदा व चेतनने ”शप्पू”ला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. कुक्की- पन्ना आणि बाकीची यंग ब्रिगेड तर फॉर्ममध्ये होतीच. या अशा रंगबिरंगी रांगोळीमध्ये मी ही आपले काही रंग भरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मी आशा करते की, तो रंग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. माझ्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी हा प्रवास भावनिक होता. पुन्हा नक्कीच भेटू. पण… ‘ठिपक्यांची रांगोळी’ मात्र सदैव स्मरणात राहील माझ्या आणि तुमच्याही …’.